गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा व्हॉलीबॉलमध्ये डंका!

विभागीय स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांचा संघ अजिंक्य, थेट ‘राज्य‘ स्तरासाठी पात्र!

गडचिरोली : नुकत्याच झालेल्या विभागस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत गडचिरोलीच्या गोंडवाना सैनिकी माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयाने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. १५ ऑक्टोबर रोजी युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने झंझावाती खेळ करत विजेतेपद पटकावले आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली आहे.

नागपूर विभागातील अनेक संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मात्र, गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या खेळाडूंनी प्रत्येक सामन्यात जिद्द, शिस्त आणि उत्कृष्ट समन्वयाचा नमुना दाखवला. अखेरच्या निर्णायक सामन्यात दोन्ही संघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. हा सामना अतिशय रोमांचक झाला. यातील अंतिम सेटमध्ये १३-१५ अशा फरकाने सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आणि विजेतेपदावर नाव कोरले. त्यांच्या अचूक सर्विस आणि जबरदस्त बचावामुळे त्यांनी विजयश्री खेचून आणली.

या विजयी संघात वैष्णव विधाते, प्रिन्स पोटावी, निहाल पिंपळकर, ईशांत पिंपळकर, तिलक ढवस, स्वरूप काळे, नयन पेंदाम, तरुण बोडे, नाविन्य निखाळे, गुणवंत गौरकर, सोहम पावडे आणि अंगद फरकाडे या खेळाडूंचा समावेश आहे. सर्वांनी एकदिलाने खेळ सादर करत उत्कृष्ट संघभावनेचा परिचय दिला.

संघाला हे यश मिळवून देण्यात प्रशिक्षक खुशाल मरसकोल्हे आणि विद्यालयाचे क्रीडाप्रमुख भूपेंद्र चौधरी यांच्या कठोर परिश्रमाचे आणि मार्गदर्शनाचे मोठे योगदान आहे.

विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “आमच्या विद्यार्थ्यांची मेहनत, शिस्त आणि संघभावना यांमुळेच हे यश मिळाले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही हे विद्यार्थी आपल्या जिल्ह्याचे आणि विद्यालयाचे नाव अभिमानाने उजळवतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.” या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण विद्यालयात आणि गडचिरोली जिल्ह्याच्या क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र या खेळाडूंचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button