
फुक्कीमेटा येथील घटना : मध्यस्थी करणे पडले महागात
गोंदिया : भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलिस पाटलाला व्यक्तीने डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून जखमी केले. तर त्याच्या हातातून कुऱ्हाड हिसकावल्याने त्याने दुसऱ्याच्या पोटावर चावा घेतला. सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम फुक्कीमेटा येथे रविवारी (दि. ५) रात्री ८ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
आरोपी तेजराम येरपुडे (५६, रा. फुक्कीमेटा) हा पत्नी इंदून येरपुडे हिच्यासोबत भांडण करीत असल्याने इंदूने फिर्यादी पोलिस पाटील चंद्रकुमार श्रीकृष्ण हुकरे (४८, रा. फुक्कीमेटा) आरोपी तेजराम याची समजूत काढण्यासाठी घरी या म्हटल्याने ते तिच्या घरी गेले. मात्र, तेथे गेल्यावर आरोपी तेजराम याने तू नेहमी माझ्या घरगुती भांडणात मधात पडतो. यामुळे पहिले तुलाच कापून ठार करतो, असे म्हणत फिर्यादी चंद्रकुमार यांच्या डोक्यावर उजव्या बाजूला कुऱ्हाडीने वार केला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर जखम होऊन रक्त निघू लागले. एवढ्यात आरोपी तेजराम दुसरा वार करण्याच्या बेतात असताना डॉ. राजकुमार हत्तीमारे यांनी त्याच्या हातातून कुन्हाड हिसकावून घेतली. यावर आरोपी डॉ. हत्तीमारे यांच्या पोटावर उजव्या बाजूला चावा घेऊन पळ काढला. पोलिसांनी भान्यासं २०२३ कलम १०९ (१), ११८(१), १२१ (२) १३२ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.



