गोंदियाविदर्भ

5 व 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आधार बायोमेट्रिक अपडेट मोहीम

शाळांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन

गोंदिया : आधार नोंदणी नियमानुसार पाच वर्षांखालील मुलांचे नोंदणीवेळी केवळ चेहऱ्याचा फोटो व लोकसंख्याशास्त्रीय माहिती घेतली जाते. बोटांचे ठसे व डोळ्याच्या बुबुळाचे (आयरीस) बायोमेट्रिक घेतले जात नाहीत. त्यामुळे पाचव्या वर्षी (MBU1) व पंधराव्या वर्षी (MBU2) बायोमेट्रिक अद्ययावत करणे अनिवार्य आहे.

मात्र, निरीक्षणात असे आढळून आले आहे की, जिल्ह्यातील मोठ्या संख्येने ५ ते १५ वयोगटातील मुलांनी अद्याप पहिला बायोमेट्रिक अपडेट (MBU1) केलेला नाही. तसेच अनेक विद्यार्थ्यांचे पंधरा वर्षांनंतरचे दुसरे बायोमेट्रिक अपडेट (MBU2) प्रलंबित आहे. यामुळे JEE, NEET यासारख्या स्पर्धा परीक्षांवेळी बायोमेट्रिक प्रमाणीकरणात अडचणी निर्माण होतात व अचानक मोठ्या प्रमाणावर अद्ययावत करण्यासाठी गर्दी होते.

ही परिस्थिती टाळण्यासाठी व प्रलंबित अपडेट पूर्ण करण्यासाठी शासनाने सदर अभियान मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश दिले असून, प्रत्येक तालुक्यासाठी किमान 2 वाहने (Dedicated Vehicle) व प्रत्येक वाहनामध्ये 2 MBU किटस् उपलब्ध करुन सलग मोहिम राबविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे, जेणेकरुन जिल्ह्यातील प्रलंबित MBU प्रकरणे तातडीने निकाली काढता येतील.

यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी आपल्या अधिपत्त्याखाली सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांना Udise 18+ या वेबपोर्टलवरुन डाटा पडताळून तातडीने गोंदिया जिल्ह्यातील आधार केंद्र चालकांना शिबीर घेण्याबाबत आवश्यक त्या सूचना देऊन पुढील कार्यवाही करावी.

प्रत्येक तालुक्यात किमान 2 वाहने उपलब्ध करुन त्यामार्फत MBU विशेष शिबिरे मिशन मोडमध्ये आयोजित करावीत. सर्व शाळांमध्ये प्रलंबित विद्यार्थ्यांची यादी तयार करुन शिबिरांचे वेळापत्रक निश्चित करावे. दररोजच्या MBU प्रगतीचा आढावा घेवून प्रलंबित प्रकरणे तातडीने पूर्ण करावीत. झालेल्या कार्यवाहीचा व प्रगतीचा अहवाल नियमितपणे जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान शाखेत सादर करावा.

याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी (आधार प्रकल्प) भैय्यासाहेब बेहेरे यांनी सांगितले की, “शिष्यवृत्ती, शालेय व महाविद्यालयीन प्रवेश, बँक व्यवहार तसेच इतर महत्त्वाच्या सेवांसाठी आधारमधील अद्ययावत माहिती आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मुलांचे बायोमेट्रिक वेळेत अद्ययावत करणे अत्यंत गरजेचे आहे.” ही मोहीम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या देखरेखीखाली प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button