
गोंदिया : तिरोडा येथील पंचायत समिती सभागृहात २५ जून रोजी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम आणि कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम यांची एकत्रित आढावा सभा संपन्न झाली. या सभेत तिरोडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दर्शना नंदागवळी, क्षयरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे व डॉ. देव चांदेवर, तर कुष्ठरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्यश्री गावंडे यांनी आपापल्या विभागांचा आढावा घेतला. या आढावा सभेला तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सहायक आणि आरोग्य सहायिका उपस्थित होत्या.
क्षयरोगाचे विभागाचे डॉ. देव चांदेवर यांनी भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी धोरणानुसार सन २०२५ पर्यंत ‘टीबी मुक्त भारत’ करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. या दृष्टीने जिल्ह्यात ‘टीबी मुक्त भारत’ कार्यक्रमांतर्गत रुग्णशोध मोहीम वेगाने वाढवण्यावर जोर देण्यात येत आहे. सर्व आरोग्य संस्थांनी नवीन क्षयरुग्णांची शोध मोहीम राबवावी, त्यात थुंकी नमुने तपासणी व एक्स-रे तपासणी शिबिरे कार्यक्षेत्रात राबवून रुग्णांना मोफत औषधोपचार देण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यावर क्षयरोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो, त्यामुळे क्षयरोगाचा प्रसार आणि मृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीने आरोग्य संस्थेत निक्षय शिबीर राबवण्याचे निर्देशही त्यांनी उपस्थितांना दिले.
डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी ‘टीबी मुक्त भारत’ कार्यक्रमांतर्गत निक्षय शिबिराद्वारे कार्यक्षेत्रातील अतिजोखमीच्या लोकसंख्येची तपासणी करण्याचे निर्देश दिले. यामध्ये दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवसाचा खोकला, अशक्तपणा, वजन कमी होणे, छातीत दुखणे, संध्याकाळी येणारा हलका ताप, थुंकीवाटे रक्त पडणे, पूर्वी क्षयरोग झालेले क्षयरोग बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती, एचआयव्ही बाधित रुग्ण, कुपोषित व्यक्ती, ६० वर्षांवरील व्यक्ती, मधुमेह बाधित, आणि धुम्रपान करणारे व्यक्ती यांची यादी पोर्टलवर अद्ययावत करून टीबी संशयित लोकांची नोंद निक्षय पोर्टलवर करावी. तसेच, टीबी सहवासित लोकांची सीवाय टीबी तपासणी आणि जिओटॅगिंग करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
कुष्ठरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्यश्री गावंडे यांनी कुष्ठरोग हा दुर्लक्षित आजार असून, लोकांमध्ये लक्षणे जाणवत नसली तरी शरीरावर दिसणारे लालसर, न खाजणारे व चकाकणारे डाग किंवा चट्टा, अंगावरील गाठी, कानाच्या जाड झालेल्या पाळ्या, स्नायूंचा अशक्तपणा, चट्ट्याच्या जवळून जाणारी नस जाड यावर नियमित सर्वेक्षणामध्ये अशा रुग्णांना शोधून सद्यस्थितीत एप्रिल २०२५ मधील सुधारित कुष्ठरोग औषधोपचार रुग्णांना नियमित द्यावे, असे सांगितले. लोकांमध्ये कुष्ठरोग आजाराबाबत जनजागृती करावी आणि कुष्ठरोगाबद्दल समाजात असलेले गैरसमज व अंधश्रद्धा यांचे निराकरण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
आढावा सभा यशस्वी करण्यासाठी तिरोडा तालुका आरोग्य सहाय्यक लिलाधर निपाणे यांनी विशेष प्रयत्न केले.



