
जिल्हा प्रशासन आणि ‘प्रधान’ संस्थेत सामंजस्य करार ; टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ५ वर्षांत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट होणार
गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या ‘विकसित विदर्भ’ या महत्त्वाकांक्षी दृष्टीकोनाशी सुसंगत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यात ‘नीव’ (NEEV) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी १३ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासन आणि ‘प्रधान’ (PRADAN) संस्था यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा आणि प्रधान संस्थेचे कार्यकारी संचालक सरोज महापात्रा यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील १५,००० ग्रामीण व आदिवासी कुटुंबांच्या जीवनात समृद्धीची नवी ‘नीव’ रचली जाणार आहे.
टाटा ट्रस्टच्या सहयोगाने राबविण्यात येणारा हा उपक्रम पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी निश्चित करण्यात आला आहे. हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. पुनरुत्पादक शेती: नैसर्गिक संसाधनांचा समतोल राखून शेती उत्पादकता वाढविणे. जलसंधारण: जलस्रोतांचा विकास आणि पाणी साठवणूक क्षमता वाढविण्यावर भर. वनाधारित उपजीविका: जिल्ह्यातील वनसंपत्तीवर आधारित रोजगाराच्या संधींचे बळकटीकरण करणे. पशुधन व मत्स्यपालन: शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन आणि मत्स्यपालनाला विशेष चालना देणे. महिला सक्षमीकरण: महिलांच्या नेतृत्वाखालील स्वयंसहायता गट आणि संस्थांना अधिक सक्षम करणे. ही प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे आहेत.
‘नीव’ प्रकल्पांतर्गत केवळ आर्थिक विकासच नव्हे, तर प्रशासकीय बळकटीकरणावरही लक्ष दिले जाणार आहे. ग्रामपंचायत स्तरावरील नियोजन प्रणाली अधिक पारदर्शक आणि प्रभावी करून स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरवली जाईल. यामुळे शासकीय योजनांचा लाभ थेट शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
या सामंजस्य करारामुळे जिल्हा प्रशासन आणि ‘प्रधान’ संस्था यांच्यात समन्वयाची एक अधिकृत चौकट तयार झाली आहे. क्षमता विकास, उपजीविका उपक्रमांची नियमित देखरेख आणि तांत्रिक सहकार्य यासाठी दोन्ही यंत्रणा एकत्रितपणे काम करतील. या स्वाक्षरी सोहळ्याला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, प्रधान संस्थेचे कार्यकारी संचालक सरोज महापात्रा, डॉ. हर्षा वशिष्ठ (सीओई लीड), कुंतल मुखर्जी आणि दिगंबर चौधरी यांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



