
देऊटोला-बबई गावाजवळील घटना ; पोलिसांच्या तपासात खून केल्याचे उघडकीस
गोंदिया : विटभट्टीवर कामावर असताना सूत जुळून त्यात तरूणी गर्भवती झाली व तिच्यापासून पिच्छा सोडविण्यासाठी तरूणाने तिचा गळा आवळून खून केला. एवढेच नव्हे तर ओळख पटू नये यासाठी तिला अर्धवट जाळले. गोरेगाव तालुक्यातील देऊटोला-बबई गावालगत असलेल्या कालव्याजवळ घडलेली ही घटना सोमवारी (दि. १०) सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पौर्णिमा विनोद नागवंशी (१८, रा. मानेकसा) असे मृत तरूणीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास काही गावकऱ्यांना कालव्याजवळ महिलेचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळला. गावकऱ्यांनी याची माहिती गोरेगाव पोलिसांना दिली असता पोलिस निरीक्षक अजय भुसारी यांनी ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. तर पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनीही घटनास्थळा भेट दिली. या प्रकरणाचा तपास करीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी शकील मुस्तफा सिद्दीकी (३८, रा. मामा चौक, गोविंदपुर रोड, गोंदिया) याने तिचा खून केल्याचे उघडकीस आणून त्याला ताब्यात घेतले.
आरोपीने पौर्णिमाचा गळा आवळून खून केला व ओळख पटू नये यासाठी तिला जाळल्याची कबूली दिली. अंगावर चादर व तनस टाकून जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुलीला त्याने गरोदर केल्याने ती मुलगी आता पती-पत्नी म्हणून एकत्र राहू म्हणत असल्याने तिच्यापासून आपली सुटका करून घेण्याकरिता तिला जिवे मारले. आरोपीला गोरेगाव पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कामगिरी स्थागुशाचे निरीक्षक दिनेश लबडे, भुसारी, सपोनि धीरज राजूरकर, महिला पो उपनि. वनिता सायकर, हवालदार राजू मिश्रा, नेवालाल भेलावे, चित्तरंजन कोडापे, विठ्ठल ठाकरे, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, रियाज शेख, इंद्रजीत बिसेन, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, सुबोध बिसेन, अजय रहांगडाले, हंसराज भांडारकर, संतोष केदार, महिला शिपाई स्मिता तोंडरे, दुर्गेश पाटील, कुंभलवार, राम खंडारे, पोनि. पुरुषोत्तम अहेरकर, सपोनिओमप्रकाश गेडाम, रोशन येरणे, योगेश रहिले यांनी केली.



