गडचिरोलीविदर्भ

आश्रमशाळा सोडे येथे ‘बाल मैत्रीपूर्ण आश्रमशाळा’ विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर

२४ शाळांमधील अधीक्षक व अधीक्षकांची ‘बाल संरक्षण फोकल पर्सन’ म्हणून नियुक्ती; बाल हक्क व आरोग्यावर सखोल मार्गदर्शन

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग, युनिसेफ (UNICEF) आणि ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ (कुरखेडा) या स्थानिक सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने “आदिवासी आश्रमशाळा स्तरावर बाल संरक्षण प्रणाली स्थापित करणे – बाल मैत्रीपूर्ण आश्रमशाळा” उपक्रम मागील दीड वर्षापासून यशस्वीपणे राबविला जात आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून मंगळवारी (दि. २८) शासकीय आदिवासी आश्रमशाळा सोडे येथे गडचिरोली प्रकल्पातील अधीक्षक व अधीक्षकांसाठी एकदिवसीय विशेष प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले.

आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये सक्षम, सुरक्षित व बालकेंद्रित वातावरण तयार करून प्रत्येक विद्यार्थ्याला सन्मानपूर्वक आणि विकासाला पोषक वातावरण उपलब्ध करून देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उद्देशाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गडचिरोली प्रकल्पातील २४ आश्रमशाळांमधील अधीक्षक आणि अधीक्षकांची ‘बाल संरक्षण फोकल पर्सन’ (Child Protection Focal Person) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशिक्षणादरम्यान आश्रमशाळा स्तरावर बाल संरक्षण प्रणाली बळकट करणे आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या विविध महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले: सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करताना नियमित आरोग्य तपासणी करणे, आजारी बालकांची स्वतंत्र यादी तयार ठेवणे, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवणे आणि शाळा स्तरावर आरोग्य अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक ठळकपणे लावण्याच्या सूचना दिल्या.

शिबिरात मुलांचा जगण्याचा, विकासाचा, सहभागाचा व संरक्षणाचा हक्क यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासोबतच ‘पोक्सो कायदा २०१२’ (POCSO Act) आणि ‘बाल न्याय (काळजी व संरक्षण) कायदा २०१५’ याविषयी उपस्थितांना सखोल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमधील शारीरिक व मानसिक त्रासाची लक्षणे ओळखून त्यांना वेळीच मदत करणे, आश्रमशाळेतील सुरक्षित व असुरक्षित जागांची पाहणी करणे यावर भर देण्यात आला. मुलांना मोकळेपणाने व्यक्त होता यावे यासाठी ‘संवाद पेटी’चा प्रभावी वापर करणे, मुलांच्या विचारांना प्राधान्य देणे आणि त्यांच्यात जीवन कौशल्यांचा (Life Skills) विकास घडवून आणण्याबाबत प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षण शिबीराला सहाय्यक प्रकल्प अधिकारी नरेंद्र कावळे, शासकीय आश्रमशाळा सोडेचे मुख्याध्यापक मंडलवार, प्रकल्प समन्वयक सैदुल टेकाम, तसेच आश्रमशाळा मोबिलायझर विजयालक्ष्मी वघारे, संदीप लाडे आणि घनश्याम गहाणे यांच्यासह गडचिरोली प्रकल्पातील अधीक्षक व अधीक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button