
गडचिरोली : देसाईगंज शहरातील माता वॉर्ड आता अवैध दारूविक्रीमुक्त झाला आहे. ‘मुक्तिपथ’ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली वॉर्डातील नागरिकांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आणि पोलीस विभागाच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी झाली आहे. विशेष म्हणजे, अवैध दारूविक्री बंद झाल्यानंतर एका महिलेने आता भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करून सकारात्मक बदल घडवला आहे.
वडसा येथील माता वॉर्डात अवैध दारूविक्री बंद करण्याच्या उद्देशाने मुक्तिपथने वॉर्डातील सर्व नागरिकांची बैठक घेतली. त्यानंतर ‘दारूबंदीसाठी सहभागी व्हा’ असे आवाहन बॅनरच्या माध्यमातून करण्यात आले. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत वॉर्डातील ९९ नागरिकांनी आपला सहभाग दर्शविला. मुक्तिपथ आणि माता वॉर्डातील सर्व नागरिकांनी मिळून देसाईगंज पोलीस स्टेशन, नगर परिषद आणि तहसील कार्यालयात निवेदन देत अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी केली.
या निवेदनाची दखल घेत देसाईगंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमृतलाल गोडबोले यांनी दारूविक्रेत्यांविरोधात कारवाई केली आणि त्यांना दारूविक्री पूर्णपणे थांबवण्याची ताकीद दिली. वॉर्डातील पदाधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी अवैध दारू विक्री होत होती, तिथे दारूबंदीचे बॅनर लावून वॉर्डात दारूबंदी जाहीर केली. आता वॉर्डातील अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद झाली असून, शांतता व सुव्यवस्था कायम आहे. या मोहिमेमुळे एक सकारात्मक बदल दिसून आला आहे. ज्या महिलेने यापूर्वी अवैध दारू विक्री केली होती, तिने आता हा व्यवसाय सोडून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. हा बदल समाजासाठी एक आदर्श बनला आहे.
ही दारूबंदी लागू करण्यासाठी वॉर्डातील कृष्णदास कोहचाळे, दिलीप अजे, दिनेश पत्रे, मनेष खरकाटे, वसंता भांडारकर, नितीन खरकाटे, वृषभ सिंगाडे, शामू उईके, लोमेश्वर कटरे, प्रदीप आतला, उर्मिला कोहचाडे, भाविका भुर्रे, दुर्गा अजे, मंगला भूर्रे, शकुन पत्रे, सुनीता सिडाम, प्रीती पत्रे, मंगला पत्रे, लता पत्रे, दुर्गा खरकाटे, देवकन्या खरकाटे, ज्योती भुर्रे, कमल भुर्रे, द्रौपदी नागपुरे, सीमा कटरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
वॉर्डातील दारूबंदी कायम टिकवून राहावी यासाठी मुक्तिपथचे प्रभारी संघटक लेखाराम हुलके आणि तालुका प्रेरक हेमंत मेश्राम हे वेळोवेळी वॉर्डात जाऊन पाठपुरावा करत नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत.



