
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला ट्रक
सिरोंचा : तेलंगणा राज्यात जनावरांना कत्तलीसाठी नेत असलेला ट्रक पकडून जवळपास २५ जनावरांना जीवनदान दिले आहे. ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.
उपप्रादेशिक परिवहन विभागाचे पथक सिरोंचा तालुक्यातील धर्मपुरी गावाजवळ वाहनांची तपासणी करीत होते. दरम्यान, गाय व बैल यांना घेऊन ट्रक तेलंगणा राज्यात जात होता. आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांना बघून चालकाने वाहन थांबविले व पळ काढला. वाहनाची तपासणी केली असता वाहनात जवळपास २५ जनावरे आढळून आली.
सदर ट्रक सिरोंचा पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आला. ट्रकमध्ये जवळपास २५ जनावरे आढळून आली. सदर कारवाई उप प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी पवन येवले व किरण पारकी यांच्या पथकाने केली. पुढील तपास ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
ही सर्व जनावरे सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरून तेलंगणा राज्यात नेली जात होती. मात्र मध्येच ट्रक पकडण्यात आला. चालक व सोबत असलेला एक व्यक्ती ट्रक ठेवून पसार झाला.



