
कडक उन्हातही डॉक्टरांच्या चमूने दिली अविरत सेवा ; दुर्गम भागातील दिव्यांगांना मिळाला हक्काचा आधार.
सिरोंचा : जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली आणि पंचायत समिती सिरोंचा यांच्या संयुक्त विद्यमाने सिरोंचा येथे आयोजित भव्य दिव्यांग तपासणी शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. कडक उन्हाची तमा न बाळगता दुर्गम भागातील तब्बल ८१६ लाभार्थ्यांनी या शिबिरात उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी करून घेतली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने दिवसभर सेवा दिली. यामध्ये प्रामुख्याने डॉ. बाळू सहारे, डॉ. मनीष मेश्राम, डॉ. ईश्वर मेश्राम, डॉ. प्रशांत पेंदाम, डॉ. मोरे यांच्यासह तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट आणि सायकॉलॉजिस्टच्या टीमने मोलाचे योगदान दिले.
शिबिरात आलेल्या ८१६ लाभार्थ्यांची विविध विभागांतर्गत विभागणी करून तपासणी करण्यात आली: सामान्य तपासणी: ६५३ लाभार्थी, अस्थिव्यंग तपासणी: ६१ लाभार्थी, बौद्धिक व मानसिक अक्षमता: ३८ लाभार्थी, सिकलसेल तपासणी: १९ लाभार्थी , अंधत्व तपासणी: ०९ लाभार्थी, जुने प्रमाणपत्र नूतनीकरण: ३६ लाभार्थी.
डॉ. वर्षा लहाडे यांनी सांगितले की, दुर्गम भागातील दिव्यांगांना त्यांच्या हक्काचे प्रमाणपत्र आणि उपचार मिळवून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. प्रतिकूल हवामानातही डॉक्टरांच्या टीमने संयमाने प्रत्येक रुग्णाची तपासणी केल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. छाया उईके यांनी लाभार्थ्यांच्या मोठ्या संख्येला स्थानिक नियोजनाचे यश मानले, तर गट विकास अधिकारी सुखीराम कस्तुरे यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत पोहोचल्याचा आनंद व्यक्त केला.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर कन्नाके यांनी स्थानिक आरोग्य कर्मचारी आणि परिचारिकांच्या अहोरात्र मेहनतीचे कौतुक करत, आरोग्य सुविधा शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन केले.



