गोंदियाविदर्भ

जिल्ह्यात प्री-टास सर्वेक्षण मोहीम फत्ते; एकाच रात्रीत ३६०० रक्त नमुने संकलन

कडाक्याच्या थंडीतही आरोग्य कर्मचाऱ्यांचे समर्पण ; ४ तालुक्यातील १२ गावांमध्ये हत्तीरोग नियंत्रण मोहीम यशस्वी

गोंदिया : हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्री-टास सर्वेक्षण मोहीम गोंदिया जिल्ह्यात यशस्वीरित्या पार पडली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १२ गावांमध्ये रात्रकालीन रक्त संकलन मोहीम आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे, कडाक्याच्या थंडीतही आरोग्य कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून एकाच रात्रीत तब्बल ३६०० रक्त नमुने संकलित करून मोहीम ‘फत्ते’ केली.

मार्च ते एप्रिल २०२५ दरम्यान राबविण्यात आलेल्या सामुदायिक औषधोपचार (DEC व अल्बेंडेझॉल गोळ्या) मोहिमेच्या यशाचे मूल्यमापन करणे, हा या प्री-टास सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश होता. गोंदिया तालुक्यातील दांडेगाव, दवनीवाडा व गोंदिया शहरातील छोटा गोंदिया. तिरोडा तालुक्यातील कोडेलोहारा, मुंडिकोटा व तिरोडा शहरातील तिलक वॉर्ड. गोरेगाव तालुक्यातील हिरदामाली, पुलगाव, भडंगा. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ईटखेडा,वडेगाव व सुरबन (बोंडगाव) या 12 गावात मोहिम प्री-टास सर्वेक्षण दरम्यान रात्रकालीन रक्त संकलन मोहीम फत्ते झाली.

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी रात्री १० वाजता हिरडामाली येथे पोहचून मोहिमेचे पर्यवेक्षण केले. त्यावेळी ग्राम हिरडामालीचे सरपंच चौधरी आणि प्रा. आ. केंद्र सोनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीप बघेले उपस्थित होते.

जिल्हास्तरावरुन के.एन. डोंगरे, एन.एल. ठाकुर, एल. फरकुंडे, ए.एफ. बिरमगडे, नंदकिशोर भालेराव यांची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, समुदाय आरोग्य अधिकारी यांनी नियोजनात सहभाग घेतला.

प्री-टास सर्वेक्षण दरम्यान रात्रकालीन रक्त संकलन मोहीम यशस्वी केल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, आरोग्य पर्यवेक्षक यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button