
गोंदिया जिल्हा प्रशासनाचा पुढाकार ; ढाकणी ग्रामपंचायतीत जनजागृती व मार्गदर्शन
गोंदिया : युवा पिढीला तंबाखूच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि जिल्ह्याला पूर्णपणे तंबाखूमुक्त करण्यासाठी ‘तंबाखू मुक्त युवा अभियान ३.०’ अंतर्गत आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि ग्रामपंचायती तंबाखूमुक्त करणे हा असून, तरुणांमध्ये या घातक व्यसनाविरुद्ध व्यापक जागरूकता निर्माण केली जात आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय पथकाने नुकतीच गोंदिया तालुक्यातील ग्रामपंचायत ढाकणी येथे भेट दिली. यावेळी गावाला ‘तंबाखूमुक्त गाव’ म्हणून घोषित करण्यासाठी आवश्यक असलेले नऊ निकष सरपंच भावना पालांदुरकर यांना सविस्तर समजावून सांगण्यात आले.
याप्रसंगी ‘कोटपा कायदा २००३’ (COTPA) अंतर्गत असलेल्या विविध कलमांची माहिती देणारी पुस्तिका आणि जनजागृती साहित्य सरपंचांना सुपूर्द करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे आणि शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे हा कायद्याने गुन्हा असून, यावर ग्रामपंचायतींनी कडक लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
के.टी.एस. शासकीय सामान्य रुग्णालयातील विशेष पथक जिल्ह्यात ठिकठिकाणी जाऊन प्रतिबंधात्मक कार्यवाही करत आहे. या भेटीदरम्यान जिल्हा सल्लागार डॉ. ज्योती राठोड, मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर, दंत तंत्रज्ञ यश जयस्वाल आणि दंत सहाय्यक विवेकानंद कोरे यांनी ग्रामस्थांना तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम सांगून व्यसनमुक्तीची शपथ दिली.
अभियानाचे प्रमुख मुद्दे:
विक्रीवर नियंत्रण: अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने गुटखा आणि तंबाखू विक्रीवर कडक निर्बंध. दंडात्मक कारवाई: सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन करणाऱ्यांवर आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाईचे निर्देश. ग्रामसभांमध्ये चर्चा: प्रत्येक ग्रामसभेमध्ये तंबाखूमुक्तीचा विषय प्राधान्याने घेऊन लोकसहभाग वाढवणे.
“तंबाखू मुक्त युवा अभियान हे केवळ एक सरकारी अभियान नसून, सुदृढ पिढी घडवण्यासाठी सुरू केलेली लोकचळवळ आहे. प्रत्येक नागरिकाने यात सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाने केले आहे.



