
सर्च आणि युवा मंडळाचा पुढाकार ; २४ संघांचा समावेश
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील २०० गावांमध्ये १५ दिवस दारूमुक्त युवा क्रीडा स्पर्धा होणार असून, या उपक्रमाचे आयोजन सर्च संस्था, आदिवासी युवा मंडळ आणि ग्रामसभांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. डॉ. के.व्ही. चारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. गेल्या २२ वर्षांपासून तालुक्यात क्रीडा स्पर्धा घेतल्या जात असून, यावर्षीही ५ क्लस्टरमध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.
खेळ आणि आदिवासींचे अतूट नाते जपणाऱ्या या स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी, लांब उडी, गोळाफेक, भालाफेक, १०० मीटर धावणे यासारख्या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. १९ ते २१ डिसेंबरदरम्यान कारवाफा क्लस्टरमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीत व्हॉलीबॉल व कबड्डी या स्पर्धांमध्ये ४० संघांनी सहभाग घेतला, तर वैयक्तिक स्पर्धांमध्ये १०७ युवक-युवती सहभागी झाले होते.
उद्घाटनाच्या दिवशी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये ४५ महिलांनी सहभाग घेतला. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमात विविध २४ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना सर्च संस्थेतर्फे बक्षिसे देण्यात आली. या क्रीडा स्पर्धा केवळ खेळांचा आनंद देणाऱ्या नाहीत, तर ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक प्रेरणादायी उपक्रम ठरत आहेत. सीताटोला (रांगी क्लस्टर), मॅढा (धानोरा क्लस्टर), पन्नेमारा (मुरुमगाव) आणि चिचोडा (पेंढरी क्लस्टर) या गावांमध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
खेळ आणि व्यायामाने खेळाडूंची बुद्धी व मन तल्लख होते. खेळामुळे शरिरामध्ये स्फूर्ती येऊन ताजेपणा वाढतो. खेळामुळे आरोग्य सुदृढ राहते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित खेळ खेळले पाहिजे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी यावेळी केले.
स्पर्धाचा निकाल
व्हॉलीबॉल स्पर्धा :- युवक गट : प्रथम क्रमांक हनपायली, द्वितीय क्रमांक – साखेरा, युवती गट : प्रथम क्रमांक साखेराटोला, द्वितीय क्रमांक – घोडेझरी
कबड्डी स्पर्धा :- युवक गट : प्रथम क्रर्माक साखेरा, द्वितीय क्रमांक – कुथेगाव, युवती गट : प्रथम क्रमांक साखेरा, द्वितीय क्रमांक – फाशीटोला



