गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीत ‘कृषी सप्ताह’ उत्साहात; कृषी विज्ञान केंद्रातर्फे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे

गडचिरोली: हरितक्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर साजरा करण्यात आलेल्या ‘कृषी सप्ताहा’चे औचित्य साधून, गडचिरोली येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे १ ते ७ जुलै दरम्यान विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गडचिरोली, कणेरी, कासवी, नैनपूर, निमगाव, कुनघाडा माल आणि बोदली या गावांमधील शेतकऱ्यांसाठी आयोजित या सप्ताहात आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि पूरक व्यवसायांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. किशोर झाडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित या सप्ताहात विविध विषयांवरील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. झाडे यांनी धान, तूर व कापूस पिकांच्या सुधारित लागवड पद्धती आणि बीज प्रक्रियेवर भर दिला. तर सुचित लाकडे यांनी फळे व भाजीपाला लागवडीच्या प्रगत तंत्रांची माहिती दिली.

डॉ. प्रितम चिरडे यांनी धानाची पट्टा व ‘श्री’ पद्धत, तन व्यवस्थापन आणि जैविक निविष्ठा निर्मितीचे महत्त्व पटवून दिले. डॉ. विक्रम कदम यांनी दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन व शेळी पालनासोबतच पावसाळ्यात जनावरांची निगा राखण्याबाबत मार्गदर्शन केले. स्नेहा वेलादी यांनी धान लागवड व काढणी यंत्रांच्या वापरासह सीताफळ गर काढणी यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवून प्रक्रिया उद्योगाची दारे खुली करून दिली.

या कृषी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित प्रशिक्षणे, कार्यशाळा आणि प्रात्यक्षिकांमुळे शेतकऱ्यांना शेतीतील उत्पादकता वाढवण्यास मोठी मदत होणार आहे. या सात दिवसांच्या उपक्रमात शेतकरी बंधू-भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती फायदेशीर करण्याकडे कल वाढल्याचे या सप्ताहाच्या यशामुळे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button