
गोंदिया : शहर पोलिस ठाण्याच्या अभिलेखावरील फरार आरोपी राजकुमार ऊर्फ विक्की दीपक बन्सोड (वय ३९) रा. गांधी वॉर्ड, गोंदिया याला तब्बल १९ वर्षांनंतर ११ ऑगस्ट रोजी भंडारा रोड रेल्वे स्टेशन येथून अटक करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाने त्या आरोपीला जिल्हा कारागृह, भंडारा येथे पाठविण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी गोंदिया जिल्ह्यातील पोलिस स्टेशन अभिलेखावरील फरार आरोपींना अटक करण्याचे निर्देश सर्व ठाणेदारांना दिले आहेत. गोंदिया शहर पोलिस ठाण्यात दाखल अपराध क्रमांक १५४/२००५ कलम २२४ भादंवि गुन्ह्यातील तब्बल १९ वर्षांपासून फरार आरोपी हा २६ ऑगस्ट २००५ रोजी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी गोंदिया यांच्या न्यायालय परिसरातून पळून गेला होता. गोंदिया शहर पोलिस त्यांच्या शोधात होते. अखेर शहर पोलिसांनी १९ वर्षांनंतर आरोपीला जेरबंद केले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशावरून उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिनी बानकर, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक सहायक फौजदार राजकुमार बिडकर, पोलिस शिपाई सुरेश चौधरी, कमलेश बोरकर, रमेश कळाम, राहुल रामटेके, महिला पोलिस शिपाई सोनाली भालाधरे यांनी केली आहे.



