गडचिरोलीविदर्भ

राष्ट्रीय रक्तदान दिनानिमित्त २४० विद्यार्थ्यांनी घेतली सामूहिक रक्तदान प्रतिज्ञा

पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण ठरले प्रेरणास्रोत; ‘रक्तदान हीच खरी मानवतेची सेवा’

गडचिरोली: राष्ट्रीय रक्तदान दिवसाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्ह्यातील युवकांमध्ये रक्तदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, येनापूर आणि स्वप्नझेप अकॅडमी, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर २०२५ रोजी एमआयडीसी मैदान, गडचिरोली येथे सामूहिक रक्तदान प्रतिज्ञा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात तब्बल २४० विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी सामूहिकरीत्या रक्तदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.

या कार्यक्रमाला पोलिस स्टेशन गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञेचे वाचन करून घेतले. विनोद चव्हाण यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे, त्यांनी आतापर्यंत ५७ वेळा रक्तदान केले आहे आणि त्यांचा रक्तगट A निगेटिव्ह आहे, ज्यामुळे ते स्वतः रक्तदानाचे एक मोठे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत. बाल कल्याण समितीचे सदस्य व रुदय फाउंडेशनचे अध्यक्ष काशिनाथ देवगळे यांनीही मार्गदर्शन करताना समाजातील प्रत्येकाने शरीर तंदुरुस्त ठेवून रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

जिल्हा रक्तदूत रविंद्र बंडावार यांनी आपल्या प्रास्ताविकातून रक्तदानाबाबत समाजातील गैरसमज दूर करण्याची आणि नियमित रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, “रक्तदान ही मानवतेची खरी सेवा आहे—प्रत्येकाने दरवर्षी किमान एकदा रक्तदान करावे.”

यावेळी स्वप्नझेप अकॅडमीचे व्याख्याता व मार्गदर्शक सुमित चव्हाण हेही उपस्थित होते. या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील युवकांमध्ये रक्तदानाबाबत सकारात्मक संदेश पोहोचविण्यात आला आणि “रक्तदान – जीवनदान” या संदेशाला नवे बळ प्राप्त झाले. कार्यक्रमाचे संचालन जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेचे तालुका रक्तदूत प्रशांत गावडे यांनी केले, तर आभार स्वप्नझेप अकॅडमीचे विद्यार्थी भूषण साहू यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button