भंडाराविदर्भ

बालमृत्यू दर कमी करण्यासाठी जिल्ह्यात ‘सान्स इनिशिएटिव्ह’ कार्यक्रम

न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू दर हजारी ०३ पेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट ; २८ फेब्रुवारी पर्यंत अभियान

भंडारा : देशात एकूण बालमृत्यूंपैकी १६.५ टक्के बालमृत्यू न्यूमोनियामुळे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार भंडारा जिल्ह्यात ‘सान्स इनिशिएटिव्ह’ (SAANS Initiative) हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. ० ते ५ वर्षे वयोगटातील न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू कमी करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

हा कार्यक्रम भंडारा जिल्ह्यात १२ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलीद सोमकुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय येथे यासंदर्भात जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.

मृत्यूदर कमी करणे: सन २०२५ पर्यंत बालकांमधील न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यूचे प्रमाण दर हजारी जिवंत बालकांमध्ये ०३ पेक्षा कमी करणे. जनजागृती: ‘न्यूमोनिया नही तो, बचपन सही’ या घोषवाक्याचा वापर करत न्यूमोनियाचा प्रतिबंध, उपचार आणि त्याबद्दलचे गैरसमज दूर करणे. हे सान्स कार्यक्रमाचे मुख्य ध्येय आहे.

जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिषा सकोडे यांनी यावेळी पीसीव्ही (PCV) लसीकरण प्रभावीपणे राबविणे आणि पीपीटी (PPT) म्हणजेच संरक्षण (Protect), प्रतिबंध (Prevent) आणि उपचार (Treat) या त्रिसूत्रीवर भर देण्याबाबत सविस्तर माहिती दिली.

बालकांच्या उपचाराकरिता आरोग्य संस्थांना बळकट करण्यावर या कार्यशाळेत भर देण्यात आला: ट्रायएज क्षेत्र (Triage Area): अतिगंभीर आजारी बालकांस उपचाराकरिता प्राधान्य देण्यासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये Triage Area तयार करण्यात यावा. प्रोटोकॉल प्रदर्शन: सर्व आरोग्य संस्थांमध्ये न्यूमोनिया ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागात प्रदर्शित करावेत. उपलब्धता: SAANS कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सर्व औषधे, उपकरणे आणि ऑक्सिजन (Oxygen) उपलब्ध असल्याची खात्री करावी. अशा सूचना देण्यात आल्या.

या कार्यशाळेत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन चव्हाण, डॉ. मोहम्मद साजिद (एस.एम.ओ नागपूर) यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button