गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

गोंडवाना विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अध्यासन केंद्राचे उद्घाटन

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्यासन केंद्राचे उद्घाटन अभिनेते आणि मुंबई विद्यापीठाच्या नाट्यकला अकादमीचे संचालक प्रा. योगेश सोमण यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य गुरुदास कामडी व डॉ. संजय गोरे, तसेच अध्यासन केंद्राचे प्रस्तावक यश बांगडे मंचावर विराजमान होते.

याप्रसंगी प्रा. सोमण म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे एकूण व्यक्तिमत्व 360 अंशाचे आहे. त्यामुळे त्यांचे साहित्यसुध्दा 360 अंशाच्या परिघात आहे. असे कोणतेच विषय नाहीत ज्यावर त्यांचे लिखाण नाही. अगदी ‘गरमागरम चिवडा’ नावाचा त्यांचा एक ग्रंथ आहे, ज्यात ते तत्कालीन राजकीय व सामाजिक वैगुण्यांवर ताशेरे ओढतात. ज्यांना तब्बल 50 वर्षाची शिक्षा ठोठावली गेली आणि ज्यांनी केवळ एका लहानश्या लोखंडी तुकड्याने भिंतीवर महाकाव्य कोरले असे जगातले ते एकमेव साहित्यिक आहेत.

सोमण पुढे म्हणाले, इंग्रजांनी भारताचा इतिहासच बदलण्याचा प्रयत्न केला. आजतागायत आपण त्याचे परिणाम भोगत आहोत. पण त्याहीवेळी ‘इतिहासाची सहा सोनेरी पाने’ या ग्रंथातून वीर सावरकरांनी देशाचा दैदीप्यमान इतिहास जागवला होता. 1857 चे नॅरेटिव्ह बदलून त्यास स्वातंत्र्य लढा म्हणणारा हा महान वीर आहे. साने गुरूजी व विनोबा भावे यांनी नजरकैदेत साहित्य निर्मिती केली. पण वीर सावरकरांनी कोलू चालवून, हालअपेष्टा सहन करीत महाकाव्य रचले, तेही भिंतीवर आणि जेव्हा ते पुसले जाणार असे माहित होताच त्या 10 हजार ओळी मुखोद्गतही केल्या आणि आपल्यापर्यंत पोहोचवल्या. अशा अफाट कर्तृत्वाला बदनाम करण्याचे काम अलीकडच्या काळात केले जाते. त्यांच्या विनंतीपत्राला माफीपत्र म्हटले जाते हे दुर्दैव आहे, असेही प्रा.सोमण म्हणाले.

कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी अध्यक्षीय भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्य क्षेत्रात किती मोठे योगदान आहे, हे आवर्जून पुढे यावे. स्वातंत्र्ययोध्दा म्हणून आमच्यासाठी ते पुज्यनीय आहेत, पण त्यांच्या साहित्याने पिढी घडवली आहे आणि म्हणून आम्ही वीर सावरकर अध्यासन नव्हे, तर वीर सावरकरांचे साहित्य अध्यासन तयार केले असल्याचे त्यांनी सांगितले. गोंडवाना विद्यापीठाकडून याच नाही, तर सार्‍याच अध्यासन केंद्रांसाठी कधीही निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा याप्रसंगी डॉ.बोकारे यांनी दिली.

याप्रसंगी अध्यासन केंद्रातर्फे आयोजित बोधचिन्ह स्पर्धेत राजन लांजेवार प्रथम, बन्सी कोठेवार व्दितीय तर यश कुमार तृतीय आले. तसेच त्यांना अनुक्रमे 5 हजार, 3 हजार व 2 हजार रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरूदास कामडी यांनी, तर अध्यासनाची माहिती यश बांगडे यांनी दिली. संचालन डॉ.सविता गोविंदवार यांनी केले. अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ.चैतन्य शिनखेडे यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित व्यवस्थापन परिषद सदस्य स्वप्निल दोंतुलवार, प्रशांत दोंतुलवार, डॉ.प्रशांत मोहिते, नंदा सातपुते, सिनेट सदस्य संजय रामगिरवार, प्रा.धमेंद्र मुनघाटे, स्वरूप तारगे आदींचे स्वागत करण्यात आले. पुनम आमवार आणि सोनाली पुराम यांनी गीत गायन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button