गडचिरोलीविदर्भ

जलव्यवस्थापनाच्या योजना कृतीत आणा – प्र. कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांचे आवाहन

जलसंपदा विभागाच्या कृती पंधरवड्याचा समारोप ; जलसंधारणावर भर देण्याची गरज व्यक्त

गडचिरोली : जलव्यवस्थापनासंबंधी तयार केलेल्या योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्षात अंमलात आणणे गरजेचे आहे, असे मत गोंडवाना विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी व्यक्त केले.

जलसंपदा विभागातर्फे आयोजित ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा २०२५’ चा समारोपीय कार्यक्रम आज गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे, कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी गिरीपुंजे, सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सविता सादमवार, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश अर्जुनवार, मनोहर हेपट आणि राहुल गुळघाने यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी सांगितले की, जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याने जलसंधारण आणि जल व्यवस्थापनाच्या क्षेत्रात एक नवी दिशा दिली आहे. या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, कालवे स्वच्छ व प्रवाही ठेवणे आणि शेतकऱ्यांपर्यंत पाण्याचा शेवटचा थेंब पोहोचवणे या उद्दिष्टांना निश्चितच गती मिळेल. या पंधरवड्यात गडचिरोली जिल्ह्यात जलसंपदा विभागाने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले. त्यांनी उपस्थितांना पाण्याचा पुनर्वापर करण्यासोबतच घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग (पावसाचे पाणी साठवण) यंत्रणा बसवण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी बोलताना सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सविता सादमवार यांनी जलसंधारणासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वच्छ मनाने सहभागी होणे किती महत्त्वाचे आहे, यावर जोर दिला.

जलजागृती पंधरवड्यादरम्यान जलसंपदा विभागाने राबवलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण शाखा अभियंता राहुल दाभाडे यांनी केले. या पंधरवड्यात उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांना जलसंपदा विभागाला दिलेल्या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपविभागीय अभियंता गणेश परदेशी यांनी केले, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी दीपक भांडेकर यांनी यशस्वीपणे पार पाडली. या कार्यक्रमाला जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता अमित डोंगरे, उपविभागीय अभियंता संतोष वाकोडे, उपविभागीय अधिकारी महिपाल मेश्राम, विविध सामाजिक कार्यकर्ते, पाणी वापर संस्थेचे सदस्य, जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button