गोंदियाविदर्भ

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाघाचा शिरकाव; तीन तासांच्या थरारानंतर जेरबंद

गोंदिया : गोंदिया शहरालगत असलेल्या ग्राम फुलचूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस शनिवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास एक पट्टेदार वाघ फिरताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वाघाच्या भीतीने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. मात्र, वन विभागाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू करून तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाघाला जेरबंद करण्यात यश मिळवले. यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या बाजूचा हा परिसर जंगल आणि नाल्यालगत असून, याच परिसरात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. मध्यरात्री वाघ आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच, वाघ बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाची रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. परिसरात झाडेझुडपे असल्याने वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे आव्हान रेस्क्यू टीमसमोर होते. तीन तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाच्या पथकाने अखेर वाघाला बेशुद्ध करत सुरक्षितपणे जेरबंद केले.

मिळालेल्या माहितीनुसार, हा वाघ काही दिवसांपूर्वी आमगाव परिसरात दिसला होता. यापूर्वी गोंदिया शहरात अस्वल आणि हरणांचाही शिरकाव झाला होता. आता थेट जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाघ आढळल्याने वन्यप्राणी शहराच्या दिशेने धाव घेत असल्याचे स्पष्ट झाले असून, शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button