गोंदियाविदर्भ

महिला व बाल विकास विभागाचा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा 

गोंदिया : 04 फेब्रुवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बाल संरक्षण समिती, बाल कल्याण समिती, चाईल्ड हेल्प लाईन, प्रायोजकत्व (sponsorship) योजनांची त्रैमासिक आढावा सभा आयोजित करण्यात आली.

जिल्हा महिला व बाल विकास आधिकारी तुषार पौनीकर यांनी सभेचे प्रास्ताविक करुन आढावा बैठकीला सुरुवात केली. जिल्हा बाल संरक्षण समिती, प्रायोजकत्व योजना, आणि चाईल्ड हेल्प लाईन त्रैमासिक बैठकीचे सादरीकरण जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांनी केले तर बाल कल्याण समितीचे सादरीकरण देवका खोब्रागडे, अध्यक्ष, बाल कल्याण समिती यांनी केले.

लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम, 2012 अंतर्गत एकूण 42 प्रकरणांचे गृहचौकशी करून बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये बालकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

दत्तक प्रक्रियेअंतर्गत एकूण 08 प्रकरणांची गृहचौकशी करून आयुक्तालयाला अहवाल सादर करण्यात आला. त्‍याचबरोबर एकूण 86 बालकांचे समुपदेशन करण्यात आले. 09 बालकांना त्यांच्या स्थानिक राज्यात स्थानांतर करून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. बाल संगोपन योजनेअंतर्गत एकूण 1,029 बालकांना प्रति माहे 2,250 रुपये प्रमाणे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

महिला बाल विकास विभागांतर्गत केंद्र शासनाच्या प्रायोजकत्व योजनेअंतर्गत एकूण 450 लाभार्थ्यांना प्रति माहे 4000 रुपये प्रमाणे प्रमाणे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

रस्त्यावर भटकणाऱ्‍या एकूण 10 बालकांना रेस्क्यु करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बाल कामगार धाडसत्रामध्ये एका बालकाला रेस्क्यु करण्यात आले असून पालकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बालकांसंबंधित विविध कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर 08, ग्रामस्तरावर 42 प्रशिक्षणे घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत या ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. चाईल्ड लाईन च्या टोल फ्री क्रमांक 1098 यावर एकुण 78 कॉल प्राप्त झाले असून सर्व प्रकरणांचे पाठपुरावा करून त्याचे निराकरण करण्यात आलेले आहे.

यादरम्यान, 02 बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले आहे. या त्रैमासिकामध्ये एकुण 21 बालकांना अनाथ प्रमाणपत्र वितरीत करण्यात आलेले आहेत. अनाथ प्रमाणपत्रामुळे 1 टक्के आरक्षण अंतर्गत गोंदिया जिल्हयातील 06 बालकांना शासकीय नोकरी मिळालेली असुन 02 बालकांना MBBS मध्ये प्रवेश प्राप्त झाले आहे. तसेच 1 बालक NURSING तथा 1 बालकाला ENGINEERING ला प्रवेश मिळाले आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी आढावा बैठकीदरम्यान बालकांच्या संरक्षणाबाबत करण्याची कार्यवाही, रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वे प्रवासात फिरत असताना रेल्वे कर्मचाऱ्यांनी मदत करावी तसेच चाईल्ड लाईन 1098 या हेल्पलाईनचा जिल्हयात जास्तीत जास्त प्रसार करण्यात यावा  व व्हाटसॲन ग्रुप तयार करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

बालविवाह, बालकामगार रस्त्यांवर भटकणारी मुले, लैंगिक अत्याचार तसेच संकटात सापडलेल्या बालकांबाबत माहिती चाईल्ड लाईन 1098 या क्रमांकावर देण्यात यावी किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांना कळविण्यात यावे, असे आवाहन मा. निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी केले.

सदर आढावा सभेला एन. के. वाळके, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, डॉ. महेंद्र गजभिये, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सुधीर महामुनी, शिक्षणाधिकारी (प्राथ.), आर. एस. मुधोळकर, डॉ. एन. जी. अग्रवाल, संदीप पटले, जिल्हा माहिती कार्यालय प्रतिनिधी, जाधव, देवका खोब्रागडे, जयश्री कापगते, वर्षा हलमारे, अल्का बोबडे, मनोजकुमार रहांगडाले, बाल कल्याण समिती गोंदिया, वंदना दुबे, पुजा डोंगरे, समन्वयक चाईल्ड लाईन, अनिल बांबोळे परिविक्षा अधिकारी, मुकेश पटले संरक्षण अधिकारी, मनिषा चौधरी, धर्मेंद्र भेलावे, अशोक बेलेकर, आसरा सिद्ध गृह अधिक्षीका आचल फुलेकर हे उपास्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button