
शहीद जवानांना आदरांजली, विद्यार्थ्यांमध्ये रुजवली शौर्याची भावना
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात २६ जुलै रोजी, वीर शहिदांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कारगिल विजय दिन मोठ्या आदराने साजरा करण्यात आला. भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याचे स्मरण करून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, तर पर्यवेक्षक अजय वानखेडे, सैनिकी निदेशक ऋषी वंजारी आणि हरिप्रसाद ध्यानी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अमर जवान प्रतिकृतीला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करून झाली.
कार्यक्रमाचे औचित्य साधून, सैनिकी निदेशक ऋषी वंजारी यांनी कारगिल विजय दिनाबद्दल विशेष मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “अतिशय कठीण परिस्थितीतही भारतीय सैन्याने कसलीही पर्वा न करता, १९९९ मध्ये लडाखमधील उत्तर कारगिल जिल्ह्यातील पर्वत शिखरांवरून पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावले आणि शेवटी विजयी पताका फडकावली. म्हणूनच त्यांच्या या शौर्य पराक्रमाचे सर्वांना स्मरण राहावे म्हणून कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.”
याप्रसंगी विद्यालयातील संगीत शिक्षक सुनील लोखंडे यांनी ‘कर चले हम फिदा’ या देशभक्तीपर गीताने शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी आपल्या भाषणात, “शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, त्यांच्या बलिदानाला कायम स्मरणात ठेवा आणि प्रत्येकांनी जमेल त्या पद्धतीने देशसेवा करण्याचा प्रयत्न करा,” असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉ. राकेश चडगुलवार यांनी केले, तर आभार ज्येष्ठ शिक्षक रवींद्र कोरे यांनी मानले. विद्यालयातील एनसीसी कॅडेट्सचे विशेष सहकार्य कार्यक्रमाला लाभले.



