गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

शिवस्वराज्य यात्रेदरम्यान भाग्यश्री आत्राम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षात प्रवेश

‘बाप-लेक एक आहे असे समजू नका’ – भाग्यश्री आत्राम

अहेरी : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष, सभापती भाग्यश्री आत्राम यांनी अखेर वडीलांची साथ सोडत तुतारी हाती घेतली. अहेरी येथे गुरूवारी (दि.13) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत त्यांनी राकाँ (श.प.) पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले.

यावेळी भाग्यश्री यांनी मी वेगळी भूमिका घेतली असली तरी बाप-लेक एकच आहे, अशी शंका घेणाऱ्यांना जाहीरपणे उत्तर देऊन आपली राजकीय महात्वाकांक्षा स्पष्ट केली. बाबा शेर आहेत तर त्यांची मुलगी पण शेरणीच आहे, आणि शेरणी जास्त खतरनाक असते, असे म्हणत त्यांनी आगामी राजकीय संघर्षाचे सुतोवाच केले. धर्मरावबाबा माझ्याबद्दल काहीही बोलले असले तरी त्यांचा आशीर्वाद समजून मी त्यावर काहीही बोलणार नाही, असे म्हणत बाबांच्या भूमिकेवर आणि त्यांच्या कार्यकाळातील कामांवर टिका केली.

कार्यक्रमाला आ.सुनील भुसारा, पक्षाचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहमूद शेख, आदिवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष जयंत बानोरे, विद्यार्थी सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडीत कांबळे, जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, ज्येष्ठ नेते सुरेश सावकार पोरेड्डीवार, अॅड.संजय ठाकरे, विदर्भ विभाग महिला आघाडीच्या अध्यक्ष शाहीन हकीम, ऋतुराज हलगेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन बाबांपासून तुम्ही दूर गेल्या असल्या तरी शरद पवार तुम्हाला जवळ करतील, असे म्हणत भाग्यश्री यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे तिकीट देण्याचे संकेत दिले. अहेरी मतदार संघावर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचाच दावा राहणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button