गडचिरोलीविदर्भ

विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेत ‘प्रजासत्ताक दिन’ उत्साहात

समाजाप्रती आपले उत्तरदायित्व ओळखा – कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

गडचिरोली : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अडपल्ली येथील नवनिर्मित विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था (UIT) परिसरात प्रथमच ध्वजारोहण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या शुभहस्ते तिरंगा फडकवण्यात आला. यावेळी विद्यापीठ प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (Preamble) सामूहिक वाचन केले. लोकशाही मूल्यांचे जतन आणि संविधानाप्रती निष्ठा राखण्याची शपथ यावेळी घेण्यात आली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, “विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेत (UIT) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून समाजाला मोठ्या अपेक्षा आहेत. तुम्ही केवळ अभियंते होणार नाही, तर समाजाचे जबाबदार घटक होणार आहात. तंत्रज्ञान शिकत असतानाच समाजाप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या समजून त्या पूर्ण करणे, हेच खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेम आहे.”

या सोहळ्याला प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, लॉयड्स मेटल्सचे रेसिडेंट डायरेक्टर लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) विक्रम मेहता, विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था संचालक प्रा. मनीष उत्तरवार, मानवविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्याम खंडारे, वित्त व लेखा अधिकारी सि. ए. भास्कर पठारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रविण पोटदुखे, आय.क्यू.एस.सी. संचालक डॉ. धनराज पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात UIT च्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते सादर केली. “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” च्या घोषणांनी अडपल्ली येथील विद्यापीठ परिसर दुमदुमून गेला होता. नवीन कॅम्पसवर झालेल्या या पहिल्याच अधिकृत ध्वजारोहण कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button