राष्ट्रीय लोकअदालतीत २८६ प्रकरणे निकाली

४ कोटी ३६ लाखांचा महसूल गोळा
गडचिरोली : राष्ट्रीय विधिसेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये लोकअदालतीचे आयोजन १४ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. यात १४२ प्रलंबित व १४१ दाखलपूर्व प्रकरणांचा निपटारा झाला. त्यातून सुमारे ४ कोटी ३६ लाख ४ हजार ३७२ रूपयांची वसुली करण्यात आली आहे.
जिल्हा विधिसेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.बी. कुलकर्णी, सचिव आर. आर. पाटील यांच्या देखरेखीत लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. पॅनल क्रमांक १ ची जबाबदारी जिल्हा न्यायाधीश पी.आर. सित्रे, पॅनल क्रमांक २ ची जबाबदारी दिवाणी न्यायाधीश एस.पी. सदाफळे, पॅनल क्रमांक ३ ची जबाबदारी सहदिवाणी न्यायाधीश सी.पी. रघुवंशी यांनी पार पाडली.
मृतकाच्या कुटुंबाला १ कोटी १५ लाख
नोव्हेंबर २०२१ मध्ये पोलीस स्टेशन गडचिरोली समोर ट्रकने झालेल्या अपघातामध्ये दुर्गेश नंदनवार यांचा मृत्यू झाला होता. त्याबाबत मोटार अपघात दावा प्राधिकरण यांच्या न्यायालयात अर्जदारांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज दाखल केला होता. दाव्याविषयी विमा कंपनी व अर्जदारामध्ये लोकन्यायालयात समझोता करण्यात आला. त्यानुसार विमा कंपनीने अर्जदारांना नुकसान भरपाई म्हणून १ कोटी १५ लाख रूपये दिले.



