
विद्यापीठस्तरीत झाडीबोली नाट्यसंमेलनाचे थाटात उद्घाटन
गडचिरोली : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतील शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जात असून, नाट्य संस्कृतीमध्ये सामान्य माणसाचे जीवन उत्कृष्टपणे चितारले जाते, असे प्रतिपादन रिद्धपूर अमरावती येथील मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी केले. गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग आणि झाडीबोली साहित्य दालन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या झाडीबोली नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात सदानंद बोरकर यांनी लिहिलेल्या आणि लोकराम शेंडे यांनी गायलेल्या गीताने झाली. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक व बोली अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर उपस्थित होते. तसेच, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, माजी झाडीबोली नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ. श्याम मोहरकर, नाट्यलेखक डॉ. सदानंद बोरकर, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अधिष्ठाता मानव विज्ञान विद्या शाखा डॉ. श्याम खंडारे, व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदास कामडी, सिनेट सदस्य संजय गजपुरे, सहा. प्रा. डॉ. सविता गोविंदवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. आवलगावकर म्हणाले, “पैसा हेच जीवनाचे एकमेव साधन नाही. आनंद आणि समाधान पैशाच्या पलीकडले असून, साहित्य हे त्यासाठी उत्तम साधन आहे. झाडीबोली साहित्य संस्कृतीचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आले की, नाट्य संस्कृतीत सर्वसामान्यांचे जीवन उत्कृष्टपणे चित्रित केले जाते.” पद्मश्री डॉ. परशुराम खुणे म्हणाले, “झाडीपट्टी रंगभूमीतून अधिक कलावंत तयार झाले पाहिजेत आणि ही कला येणाऱ्या प्रत्येक पिढीमध्ये रुजली पाहिजे.”
कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, “एखादा उपक्रम सुरू करणे सोपे असते, पण तो सातत्याने सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे. हे नाट्यसंमेलन केवळ विद्यापीठाशीच नव्हे, तर येथील कलाकारांशी जोडलेले आहे. गडचिरोली आणि चंद्रपूरमधील लोकांना विद्यापीठात आपले प्रतिबिंब दिसले पाहिजे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नीलकंठ नरवाडे यांनी केले. संचालन डॉ. हेमराज निखाडे यांनी केले आणि आभार किरण संजय गजपुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागाच्या चमूने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



