गडचिरोलीविदर्भ

मानवाधिकार संघटनेच्या वतीने माजी खा. अशोक नेते यांचा सत्कार

मानद डॉक्टरेट पदवी संपादित केल्याबद्दल भव्य सत्कार सोहळा

गडचिरोली : ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी खासदार अशोक नेते यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट या उपाधीने सन्मानित केल्याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी डॉ. नेते यांचा सपत्निक फुलांच्या मोठ्या हारासह शाल-स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. हॉटेल लँडमार्कमध्ये झालेल्या या सोहळ्यात राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या सत्कार सोहळ्यात बोलताना माजी खा. डॉ. अशोक नेते यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख केला. त्यांनी एक साधा कार्यकर्ता म्हणून गडचिरोलीत भाजपच्या रोपट्याचा वटवृक्ष करण्यापर्यंत निष्ठेने केलेल्या कामाबद्दल सांगितले. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून केलेल्या संघटन बांधणी आणि जनसंपर्कातून यश मिळत गेले असे सांगत त्यांनी आपल्या खासदार-आमदारकीच्या कार्यकाळात मार्गी लागलेल्या काही कामांचाही उल्लेख केला.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आपल्या भाषणात, “नेते साहेब हे माझे मार्गदर्शक असून त्यांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो. त्यांनी गडचिरोलीच्या विकासासाठी घेतलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत,” असे गौरवोद्गार काढले. पद्मश्री डॉ. परशुराम खुणे म्हणाले, “डॉ. नेते यांनी संघर्षातून पुढे येत, लोकसेवेच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली. त्यांचा हा सन्मान समाजासाठी प्रेरणादायी क्षण आहे.” भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे म्हणाले, “गडचिरोलीतील भाजप नेत्यांमध्ये डॉक्टरांची संख्या वाढत आहे. नेते साहेब हेही डॉक्टर झाल्याने त्यांनी ही उणीव भरून काढली.”

माजी आमदार कृष्णा गजबे व माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी आपल्या मनोगतात डॉ. अशोक नेते यांच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे यांनी समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे मनोगत यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सुशील हिंगे, भाजप किसा मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, ज्येष्ठ नेते नाना नाकाडे, समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, डॉ. चंदा कोडवते, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, कामगार सेलचे प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास, तसेच माजी खा. नेते यांच्या सहधर्मचारिणी अर्चना नेते, पूत्र अर्णव यांच्यासह इतर अनेक क्षेत्रातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन संघटना प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, प्रास्ताविक महिला आघाडीच्या अध्यक्ष मनीषा मडावी, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी केले. आभार विदर्भ कार्याध्यक्ष नेताजी सोंदोरकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button