
मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त बैठक ; दारूबंदीसाठी कृती आराखडा तयार
गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देव येथील अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी आता ग्रामपंचायत समिती आणि शक्तीपथ महिला संघटना एकत्र आल्या आहेत. मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संयुक्त बैठकीत दारूबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, दारूविक्रेत्यांना नोटीस देऊन तत्काळ अवैध व्यवसाय बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मार्कंडा देव येथे होणाऱ्या अवैध दारूविक्रीमुळे केवळ गावातीलच नव्हे, तर दारूविक्री बंद असलेल्या नजीकच्या फराडा आणि मोहुर्ली येथील मद्यपीही आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी येथे येतात. यामुळे दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, काही लोकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम झाले आहेत. त्यामुळे गाव दारूविक्रीमुक्त व्हावे, या उद्देशाने ग्रामपंचायत समिती आणि शक्तीपथ महिला संघटनेची संयुक्त बैठक मुक्तिपथच्या तालुका संघटकांच्या उपस्थितीत पार पडली.
या बैठकीत गावातील मुजोर दारू विक्रेत्यांविरोधात कृती कार्यक्रम आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये शक्तीपथ आणि ग्रामपंचायत मिळून अहिंसक कृती करणे, दारूविक्रेत्यांची सतत माहिती ठेवणे, पोलीस स्टेशनला केसेस दाखल करणे, गरज भासल्यास पोलीस अधीक्षक यांना निवेदन देणे, आदी मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
यानंतर, गावातील चार दारू विक्रेत्यांच्या घरांच्या परिसराची पाहणी केली असता, एका घरी देशी दारू मिळून आली. ही दारू जागेवरच नष्ट करून संबंधित अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. या गावातील विक्रेत्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी आपला अवैध व्यवसाय बंद केला नाही, त्यामुळे पोलीस विभागाने संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करून सहकार्य करण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.
या सभेला गावचे सरपंच मोगरे, शक्तीपथ संघटनेच्या अध्यक्षा सुनीता मरस्कोले, पोलीस पाटील आरती घनश्याम आभारे, गाव संघटना अध्यक्षा सुनीता गंधलवार, सुषमा राजू आत्राम, राजू मोगरे, मुक्तिपथ टीम यांच्यासह गावातील ३८ महिला उपस्थित होत्या.



