गडचिरोलीविदर्भ

धानोरात निर्धारित दरापेक्षा जास्त किमतीत खताची विक्री

आ. मिलिंद नरोटे यांनी केली पाहणी, योग्य दरात खत विक्री करण्याचे कृषी केंद्राला आदेश

धानोरा: धानोरा येथे युरिया खत निर्धारित दरापेक्षा जास्त किमतीत विकले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी आमदार मिलिंद नरोटे यांच्याकडे केल्या. या तक्रारीची गंभीर दखल घेत आमदार नरोटे यांनी तात्काळ कृषी केंद्राला भेट दिली आणि योग्य दरात खत विक्री करण्याचे आदेश दिले.

गेल्या एक महिन्यापासून धानोरा तालुक्यात युरिया खत उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. ३० ऑगस्ट रोजी खताचा ट्रक आल्यानंतर पिरानी कृषी केंद्र शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा घेऊन युरिया खत जास्त दराने विकत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी आमदार नरोटे यांच्याकडे केली. आमदार नरोटे यांनी तात्काळ दुकानाला भेट देऊन खताचा साठा आणि गोदामाची पाहणी केली. त्यांच्या उपस्थितीत आणि तालुका कृषी अधिकारी पवन मडावी यांच्या देखरेखीखाली सर्व शेतकऱ्यांना ₹२७० प्रति बॅग या निर्धारित दराने खताची विक्री करण्यात आली.

यावेळी आमदार नरोटे यांनी कोणत्याही कृषी केंद्र चालकाने जास्त दराने खत विकल्यास त्यांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश दिले. तालुका कृषी अधिकारी पवन मडावी यांनी माहिती दिली की, धानोरा तालुक्यात ७९ मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध झाले असून, ५५० मेट्रिक टन खताची मागणी नोंदवली आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते साईनाथ साळवे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मानद सचिव अनंत साळवे, धानोरा भाजप तालुका अध्यक्ष साजन गुंडावार, माजी नगरसेवक सुभाष धाईत, राकेश दास, राकेश खरवडे, घनश्याम मडावी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button