
गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या कोरचीतील मसेली या गावात सुरु असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी थेट दारूविक्रेत्यांच्या घरोघरी भेट देऊन मिळून आलेली दारू नष्ट केली. सोबतच ग्रामसभेमध्ये घेतलेल्या निर्णयाबद्दल माहिती देत पुन्हा दारू विक्री केल्यास ५० हजारांचा दंड वसूल करण्याचा इशाराही देण्यात आला. दारूविरोधात ग्रामस्थ एकजूट झाल्याने निश्चितच गावातील अवैध दारूविक्री थांबणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मसेली या गावात अवैधरित्या दारूचे प्रमाण वाढले होते. परिणामी गावाचे नुकसान होताना दिसून येत होते. या गंभीर समस्येतून गावाला बाहेर काढण्यासाठी मुक्तिपथ शक्तीपथ संघटनेच्या महिलांनी हिंमत दाखवून आम्ही आता त्रास सहन करणार नाही, असे म्हणत अवैध दारूविक्री विरोधात सभा भरवली. या सभेत दारूविक्री बंदीचा निर्णय झाला. आता गावात दारूविक्री केल्यास ५० हजार रुपयांचा दंड व कायदेशीर कारवाई तसेच बाहेरून दारू पिऊन येणाऱ्याकडून सुद्धा १ हजाराचा दंड वसूल करण्याचे ठरविल्यात आले. ग्रामसभेमध्ये घेतलेल्या निर्णयाची माहिती दारूविक्रेत्यांना व्हावी, याकरिता थेट विक्रेत्यांचे घर गाठून शेवटची ताकीद दिली. सोबतच अहिसंक कृती करीत मिळून आलेला मुद्देमाल नष्ट केला. या मोहिमेमुळे दारूविक्रेत्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
यावेळी गावातील सरपंच सुनील सयाम, उपसरपंच वीरेंद्र जांभुळकर, ग्रामसभा सचिव सुखदेव टेकाम, पोलिस पाटील विद्या हिडामी, मुक्तिपथचे प्रभारी संघटक धर्मेंद्र बोपचे, अरुणा गोन्नाडे, भूषण डोकरमारे, गाव संघटना अध्यक्ष बेबी कोरेटी, अर्चना उंदीरवाडे, प्रेमीला सिन्द्राम, नलिनी सिन्द्राम, उर्मिला ताडामी, मीना सयाम व ग्रामस्थ उपस्थित होते.



