
७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
गडचिरोली : शेतजमिनीची मोजणी करून सातबारा वेगळा करण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कुरखेडा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहायक रवींद्र सदाशिव दिनकोंडावार (वय ४२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), गडचिरोलीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराने भूमी अभिलेख कार्यालयातील रवींद्र दिनकोंडावार यांच्याकडे शेतजमिनीचा पोटहिस्सा मोजणी करून सातबारा वेगळा काढण्यासाठी अर्ज केला होता. हे काम करण्यासाठी दिनकोंडावार यांनी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ५ ऑगस्ट रोजी लाच मागणीची पडताळणी केली. यात दिनकोंडावार यांनी १ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, ६ ऑगस्ट रोजी तडजोडीअंती ७० हजार रुपये स्वीकारताना ACB च्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली. पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर पी. ढोले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई केली. रवींद्र दिनकोंडावार यांच्या विरोधात कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या घराचीही झडती घेण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सुनील पेद्दीवार, पोलीस हवालदार राजेश पदमगिरीवार, किशोर जौजांरकर, स्वप्नील बांबोळे, पोलीस अंमलदार संदीप उडान, संदिप घोरमोडे, प्रविण जुमनाके, हितेश जेट्टीवार, महिला पोलीस अंमलदार विद्या मशाखेत्री, जोत्सना वसाके व चापोहवा राजेश्वर कुमरे, चापोशि चापले यांनी केली.
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांनी केले आहे.



