
रिंग रोड, म्हाडाची १० हजार घरे आणि झरपट नदी पुनरुज्जीवनाला मिळणार गती ; बल्लारपूर येथे उभारणार जागतिक दर्जाचे ‘टिम्बर म्युझियम‘
चंद्रपूर : “चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही केवळ स्वप्ने पाहत नसून, एक नियोजनबद्ध ‘रोडमॅप’ तयार केला आहे. शहराचा रिंग रोड असो वा झरपट नदीचे स्वच्छता अभियान, प्रत्येक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मी ठाम संकल्प केला आहे,” असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
हिंदू नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त चंद्रपूरच्या ऐतिहासिक गांधी चौक येथे आयोजित भव्य सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विकासकामांसह पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रभक्तीचा त्रिसूत्री संदेश नागरिकांना दिला.
शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून ‘नवीन चंद्रपूर’ प्रकल्पांतर्गत ५० हेक्टर जागेवर १० हजार घरांचा भव्य प्रकल्प साकारला जात आहे. यातील पहिल्या टप्प्यात २,००४ घरांसाठी २३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. मुनगंटीवार यांनी दिली. तसेच, शहराची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित ‘रिंग रोड’ प्रकल्पाला पूर्ण क्षमतेने गती दिली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि नवीन संसद भवनात चंद्रपूरच्या सागवान लाकडाचा वापर झाला आहे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद करत त्यांनी बल्लारपूर येथे ‘टिम्बर म्युझियम-झायलरियम’ उभारण्याची घोषणा केली. यामुळे चंद्रपूरच्या लाकडाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळणार आहे.
वृक्षारोपण मोहीम: पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी १ जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे आवाहन त्यांनी केले. “जो मातीची आणि आई-वडिलांची सेवा करतो, त्याला ईश्वर भरभरून देतो,” असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले. सद्भावना उपक्रम: सामाजिक समरसता जपत रमजान महिननिमित्त भाजप अल्पसंख्यांक मोर्चातर्फे गरजू मुस्लिम बांधवांना शिरखुर्मा साहित्याचे वाटप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित जनसमुदायाला त्यांनी ‘वंदे मातरम’चा संकल्प दिला. “वंदे मातरम हा केवळ शब्द नसून तो आपल्या स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचा हुंकार आहे,” असे सांगत त्यांनी दैनंदिन जीवनात राष्ट्रप्रेम जपण्याचे आवाहन केले.
या सोहळ्याला महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, डॉ. मंगेश गुलवाडे, राहुल पावडे, रामपाल सिंग, विजय राऊत, विशाल निंबाळकर यांच्यासह अनेक नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “२०२७ चा गुढीपाडवा अधिक भव्य स्वरूपात साजरा करू,” असा निर्धार व्यक्त करत आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरकरांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामुळे चंद्रपूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विकासाच्या नव्या उमेदीचे वातावरण निर्माण झाले आहे.



