गडचिरोलीविदर्भ

आरोग्य सेविकांचा सत्कार ; आ. डॉ. नरोटे आणि सीईओ गाडे यांनी केले कौतुक

सेवानिवृत्त आणि नव्याने रुजू झालेल्या सेविकांचा सन्मान ; समस्या सोडवण्याचे आश्वासन

गडचिरोली: महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेच्या वतीने सन २०२४-२५ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक महिला आणि आरोग्य सेविका यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, नव्याने जिल्ह्यात रुजू झालेल्या आरोग्य सेविकांचे स्वागतही या कार्यक्रमात करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील सेवानिवृत्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि सरळसेवा भरतीद्वारे नव्याने रुजू झालेल्या आरोग्य सेविकांचा तसेच ज्यांनी १० ते १५ वर्षे जिल्ह्यात आरोग्य सेवा देऊन बाहेर जिल्ह्यात बदली झाली आहे, अशा आरोग्य सेविकांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुनील मडावी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले की, आरोग्य सेविका आरोग्य सेवेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. त्यांच्या समस्या लवकरच सोडविल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. सीईओ सुहास गाडे यांनीही आरोग्य सेविकांच्या जिल्हास्तरावर सोडवता येण्याजोग्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी कार्यवाही करण्याचे आणि प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमात डॉ. मडावी, डॉ. सचिन हेमके, डॉ. अमित साळवे आणि शंतनू पाटील यांनीही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. संघटनेच्या अध्यक्षा निमा आंबळकर यांनी प्रास्ताविक केले, तर आरोग्य सेवेसाठी दुर्गम भागात काम करताना येणाऱ्या समस्या व मागण्यांचे निवेदन संघटनेच्या सचिव मिनल वाळके यांनी वाचले.

कार्यक्रमाचे यशस्वी संचालन स्मीता लोणारे, हर्षा बनसोड, सारिका गेडाम आणि नलिनी भानारकर यांनी केले, तर आभार स्नेहा बनसोड यांनी मानले. कार्यक्रमासाठी संघटनेच्या पदाधिकारी सिंधू लठ्ठे, शीतल रायपुरे, दीक्षा डोंगळे, प्रणाली मेश्राम, शोभा गेडाम आणि विद्या उईके यांनी विशेष सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button