गोंदियाविदर्भ

शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखूविरोधी ‘धाडसत्र’; २७ जणांवर दंडात्मक कारवाई

४२५० रुपयांचा दंड वसूल

गोंदिया : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया यांच्या वतीने १ मे ते १५ जून या ‘तंबाखू नकार दिना’ निमित्त ४५ दिवसांच्या अभियानांतर्गत शुक्रवारी जयस्तंभ चौक येथील प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांमध्ये ‘धाडसत्र’ राबवण्यात आले. या कारवाईतून धूम्रपान निषिद्ध क्षेत्राची आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांची जनजागृती करण्यात आली.

जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागामार्फत पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे किंवा त्यांचे सेवन करण्यास मनाई आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांची तपासणी करण्यात येत आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांच्या मार्गदर्शनात जयस्तंभ चौक येथील प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांमध्ये विविध विभागांत धाड टाकण्यात आली. यावेळी २७ कर्मचारी व लोकांकडून तंबाखू आणि गुटखा खाणाऱ्या व बाळगणाऱ्यांवर तंबाखू नियंत्रण कोटपा कायदा २००३ अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतून एकूण ४२५०/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ही कार्यवाही उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसीलदार समशेर पठाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. अनिल आटे, जिल्हा सल्लागार डॉ. ज्योती राठोड, मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर, दंत सहाय्यक विवेकानंद कोरे यांचेसह पोलीस विभागाचे बक्कल क्रमांक १८१५ पोलीस हवालदार लेविस घरत, पो.स्टे. गोंदिया शहर यांनी पार पाडली. सदर धाडसत्र तंबाखू नकार दिनानिमित्ताने १ मे ते १५ जून या ४५ दिवसांच्या अभियानांतर्गत राबविण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button