गोंदियाविदर्भ

३ जूनपासून शहरात ‘अतिक्रमण हटाव’ मोहीम; नगरपरिषदेचा थेट कारवाईचा इशारा!

पहिल्या टप्प्यातील प्रमुख १० रस्त्यांची यादी जाहीर ; पूर्वसूचना न देता बांधकाम पाडले जाणार

गोंदिया : शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि मुख्य रस्ते मोकळे व श्वास घेते करण्यासाठी गोंदिया नगरपरिषदेने कंबर कसली आहे. शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या मार्गांवरील बेकायदेशीर अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यासाठी आगामी ३ जून २०२६ पासून पालिकेतर्फे धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. या धडक मोहिमेअंतर्गत रस्त्यांवरील सर्व प्रकारची तात्पुरती आणि कायमस्वरूपी अतिक्रमणे थेट पाडली जाणार असून, कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई केली जाईल, असा कडक इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे.

“शहरातील मुख्य रस्त्यांवर अनेकांनी बेकायदेशीरपणे दुकाने, ओटे, शेड आणि इतर अतिक्रमणे केली आहेत, ज्यामुळे दळणवळणास मोठा अडथळा निर्माण होत आहे. सर्व संबंधित व्यावसायिक आणि नागरिकांनी ३ जूनपूर्वी रस्त्यावरील आपले अतिक्रमण स्वखर्चाने काढून रस्ते मोकळे करावेत,” असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.

मुदतीत अतिक्रमण न काढल्यास ‘महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५’ च्या कडक कलमांन्वये प्रशासनातर्फे जप्ती आणि तोडकामाची धडक कारवाई केली जाईल. तसेच, हे अतिक्रमण काढण्यासाठी येणारा प्रशासकीय खर्च देखील संबंधित अतिक्रमणधारकाकडूनच वसूल केला जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात ‘या’ १० प्रमुख मार्गांवर चालणार बुलडोझर

नगरपरिषदेने मोहिमेच्या सुलभ नियोजनासाठी पहिल्या टप्प्यात शहरातील अत्यंत वर्दळीच्या १० प्रमुख रस्त्यांची निवड केली आहे. यामध्ये १. जयस्तंभ चौक ते नगरपरिषद कार्यालय मार्ग २. गोरेलाल चौक ते नेहरू चौक ३. जयस्तंभ चौक ते एलआयसी (LIC) चौक ४. जिल्हा क्रीडा स्टेडियम समोरील परिसर ५. अवंतीबाई चौक ते साई मंदिर मार्ग ६. नेहरू चौक ते सिव्हिल लाईन ७. कालेखा कंपनी ते रेल्वे स्टेशन मालधक्का मार्ग ८. लोहा लाईन परिसर ९. चना लाईन परिसर १०. रामनगर पोलीस ठाण्यासमोरील प्रीतम चौकाचा समावेश आहे.

पावसाळा तोंडावर असल्याने आणि बाजारपेठेतील नागरिकांची अडचण दूर करण्यासाठी ही मोहीम अत्यंत कडक पद्धतीने राबवली जाणार आहे. कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात केला जाणार असल्याची माहिती आहे. गोंदिया शहराला सुंदर आणि शिस्तबद्ध बनवण्यासाठी नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी या मोहिमेला विरोध न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन गोंदिया नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button