
आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील घटना; तरुण शेतकऱ्याच्या टोकाच्या पावलाने गाव सुन्न
आरमोरी : तालुक्यातील वैरागड येथे एक अत्यंत हृदयद्रावक आणि सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून अशोक देवराव बोधनकर (३८) या तरुण शेतकऱ्याने ११ मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. विशेष म्हणजे, ज्या तारखेला अशोकने जगाचा निरोप घेतला, बरोबर १२ वर्षांपूर्वी याच दिवशी (११ मे) त्यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला होता. या क्रूर योगायोगाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
सध्या सर्वत्र रब्बी हंगामातील धान मळणीची लगबग सुरू आहे. सोमवारी (११ मे) सकाळी अशोक नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. सकाळी १०:३० च्या सुमारास ते शेतावरून घरी परतले. घरात कुणीही नसल्याची संधी साधून, नैराश्यात असलेल्या अशोक यांनी छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने आई शेतातून घरी परतली असता, हा काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग समोर आला. आईने फोडलेल्या हंबरड्याने आजूबाजूचे ग्रामस्थ धावून आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक यांच्यावर काही खाजगी सावकार आणि सरकारी बँकांचे कर्ज होते. त्यांनी प्रामाणिकपणे अनेक कर्जांची परतफेड करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कर्जाचा नेमका डोंगर किती मोठा होता आणि त्यांना नेमकी कशाची धास्ती भरली होती की त्यांनी थेट मरणाला कवटाळले, याचे गूढ अद्याप कायम आहे.
वैरागडवासीय सध्या एका धक्कादायक योगायोगाची चर्चा करत आहेत. ११ मे २०१४ रोजी अशोकचे वडील देवराव बोधनकर यांचा मृतदेह रामाळा शेतशिवारात संशयास्पद स्थितीत आढळला होता. वडिलांच्या मृत्यूच्या जखमा भरत नाहीत तोच, बरोबर १२ वर्षांनी म्हणजेच ११ मे २०२६ रोजी मुलानेही आपली जीवनयात्रा संपविली. बाप-लेकाचा एकाच तारखेला झालेला हा करुण अंत गावकऱ्यांच्या काळजाला चटका लावून गेला आहे.
घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. अशोक यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने बोधनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



