गोंदियाविदर्भ

योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी सोडवणार – पालक सचिव रणजीतसिंह देओल यांची ग्वाही

समृद्धी महामार्गाचा नागपूरपर्यंत विस्तार; ॲग्रीस्टॅक प्रकल्पातील अडचणींवर चर्चा

गोंदिया : जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणी स्तरावर ज्या समस्या किंवा अडचणी येत असतील, त्यांचे निवारण मंत्रालय स्तरावर केले जाईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालक सचिव तथा शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. पालक सचिव रणजीतसिंह देओल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार आता नागपूर ते गोंदियापर्यंत करण्यात येत आहे. हा १६२.५७७ किलोमीटर लांबीचा महामार्ग पूर्ण होणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील ३४ गावे व बायपासकरिता ८ गावांची जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी नायर यांनी दिली.

अंमलबजावणी यंत्रणेत येणाऱ्या अडचणी मंत्रालयीन स्तरावर सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असे देओल यांनी स्पष्ट केले. पालक सचिवांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टप्पा दोन आणि कृषी उन्नती योजनेअंतर्गत ॲग्रीस्टॅक प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. ॲग्रीस्टॅक प्रकल्पात काही समस्या येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले:

वनहक्क पट्टेधारकांची इतर हक्क सदरी नोंद असल्यामुळे त्यांची ॲग्रीस्टॅक अंतर्गत नोंद होत नाही व त्यामुळे त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देता येत नाही. पीएम किसानचा लाभ देण्यासाठी शिल्लक असलेले १५% असक्रिय लाभार्थी संकेतस्थळावरून पूर्णतः डिलीट होत नसल्यामुळे १००% फार्मर आयडी बनवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास अडचण येत आहे.

जिल्हाधिकारी नायर यांनी जिल्ह्याने मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील १५० दिवसांचा कृती आराखडा समाधानकारकरीत्या पूर्ण केल्याची माहिती दिली. नुकतीच २२१ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली असून, आयगॉट (iGOT) पोर्टल वरील अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे १०० टक्के काम जिल्ह्याने केलेले आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा आढावा घेताना सौर ऊर्जा प्रकल्प आणि सीएसआर (CSR) अंतर्गत मिळणारा निधी दर्जेदार कामांसाठी खर्च करण्याच्या सूचना देओल यांनी दिल्या. जिल्हा परिषदेमार्फत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी निधी राखीव ठेवल्याबद्दल त्यांनी गोंदिया जिल्हा परिषदेच्या कामाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button