
देशी-विदेशी दारू, २ ड्रम मोहफुलाचा सडवा व इतर साहित्य जप्त, गाव संघटना व मुक्तीपथची कारवाई
गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या कोरची तालुक्यातील बेडगाव येथे मंडईच्या निमित्ताने अवैध दारूविक्रीचा प्रयत्न गाव संघटना, मुक्तीपथ आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे हाणून पाडला आहे. या कारवाईत देशी-विदेशी दारूसह मोहफुलाचा सडवा जप्त करण्यात आला असून विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
बेडगावमध्ये गेल्या चार महिन्यांपासून दारूविक्री पूर्णपणे बंद असून गावात शांतता आहे. मात्र, गावातील ‘मंडई’ या सणाचे औचित्य साधून काही विक्रेत्यांनी देशी व विदेशी दारू विक्रीसाठी आणली होती. याची गुप्त माहिती सक्रिय कार्यकर्त्यांकडून मिळताच मुक्तीपथ व गाव संघटनेने तत्काळ पावले उचलली. पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने देशी व विदेशी दारू, २ ड्रम मोहफुलाचा सडवा, १० लिटर तयार हातभट्टी दारू व दारू गाळण्याचे इतर साहित्य जप्त करून पोलिस कारवाई करण्यात आली.
ही कारवाई यशस्वी करण्यासाठी मुक्तीपथचे तालुका संघटक धर्मेंद्र बोपचे, प्रेरक भूषण डोकरमारे, गावाचे सरपंच, उपसरपंच, गाव संघटनेचे सदस्य, सक्रिय कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते. गाव संघटनेच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, “गावात दारूबंदी कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.



