गडचिरोलीविदर्भ

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त कामगारांना अन्नधान्य किट आणि उन्हापासून संरक्षणासाठी साहित्याचे वाटप

भाजयुमोचा स्तुत्य उपक्रम ; माजी खा. डॉ. अशोक नेते यांची प्रमुख उपस्थिती

गडचिरोली : महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा (भाजयुमो), गडचिरोलीच्या वतीने कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा एक विशेष उपक्रम राबविण्यात आला. कडाक्याच्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता, कामगारांना अन्नधान्य किटसह संरक्षणात्मक साहित्याचे वाटप करून भाजयुमोने आपली सामाजिक संवेदनशीलता जपली आहे.

गडचिरोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताच्या जयघोषात कार्यक्रमाची सुरुवात झाली. या उपक्रमांतर्गत गरजू कामगारांना जीवनावश्यक अन्नधान्य किट देण्यात आले. तसेच, वाढत्या उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी टी-शर्ट, टोपी आणि हँड ग्लोज यांसारख्या साहित्याचेही वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. कामगारांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “मोठमोठे उद्योग, भव्य इमारती आणि देशाची प्रगती ही केवळ कामगारांच्या अथक श्रमांमुळेच शक्य होते. त्यांच्या सन्मानासाठी आणि जीवनमान उंचावण्यासाठी शासन व समाजाने सदैव पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे”.

या सोहळ्याला माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच भाजयुमो जिल्हा महामंत्री आकाश सातपुते, जिल्हा उपाध्यक्ष रजत वंजारी, शहराध्यक्ष साई सिल्लमवार, पत्रकार माहेश्वरी, गायत्री सोमनकर आणि भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे केवळ मदतीचा हात न देता कामगारांच्या कष्टांची कदर व्यक्त करण्यात आल्याने, शहरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button