
माजी आ. कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश
देसाईगंज : मागील अनेक महिन्यांपासून रेतीअभावी रखडलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना आता गती मिळणार आहे. माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांमुळे देसाईगंज तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत मिळणार आहे.
जिल्ह्यात शासकीय स्तरावर मंजूर झालेल्या घरकुलांचे बांधकाम रेती उपलब्ध नसल्याने थांबले होते. अनेक घरकुल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर होऊनही रेती मिळत नसल्याने बांधकाम सुरू करता आले नव्हते. त्यातच चोरट्या मार्गाने मिळणाऱ्या रेतीचे भाव गगनाला भिडले होते.
या गंभीर समस्येबाबत अनेक घरकुल लाभार्थ्यांनी माजी आमदार कृष्णा गजबे यांच्याकडे धाव घेतली होती आणि पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत माजी आमदार गजबे यांनी राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा केला. तसेच, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
माजी आमदार गजबे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, देसाईगंज तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास मोफत रेतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लाभार्थ्यांना तातडीने या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आमदार गजबे यांनी ०९ मे रोजी देसाईगंज तहसील कार्यालयाचे तहसीलदार डूडूलकर यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी तहसीलदारांना १२ मे २०२५ पासून लाभार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने पाच ब्रास रेती मोफत देण्याचे निर्देश दिले.
यावेळी देसाईगंजचे गट विकास अधिकारी, पोटगावचे सरपंच विजय दडमल, तुळशीचे सरपंच चक्रधर नाकाडे, कोकडीचे सरपंच केवळराम टिकले आणि तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते. आमदार गजबे यांच्या या प्रयत्नांमुळे देसाईगंज तालुक्यातील शेकडो घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या घरांच्या बांधकामांना लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.



