गडचिरोलीविदर्भ

‘गावात कायमची दारूबंदी हवी!’; बिहिटेखुर्दवासियांचा संतप्त सूर; १५ पेटी दारूसह मुजोर विक्रेत्याला ठोकल्या बेड्या

गावकरी व मुक्तिपथची वज्रमूठ; नियम मोडल्यास ५० हजारांच्या दंडासह पोलिसांत तक्रार करण्याचा ग्रामसभेत ऐतिहासिक ठराव!

गावकरी व मुक्तिपथची वज्रमूठ; नियम मोडल्यास ५० हजारांच्या दंडासह पोलिसांत तक्रार करण्याचा ग्रामसभेत ऐतिहासिक ठराव!

गडचिरोली / कोरची दि ५ ऑगस्ट : वर्षभरापासून गावात अवैध दारूची विक्री करून शांतता भंग करणाऱ्या एका मुजोर दारूविक्रेत्याविरोधात कोरची तालुक्यातील बिहिटेखुर्द येथील ग्रामस्थांनी एकजूट दाखवत थेट एल्गार पुकारला आहे. गावातील महिला, युवक व पुरुषांनी एकत्र येत १५ पेटी गोवा व देशी दारूसह संबंधित विक्रेत्याला रंगेहात पकडून कोरची पोलिसांच्या स्वाधीन केले. या कारवाईनंतर गावात आयोजित विशेष बैठकीत “आमच्या गावात कायमची दारूविक्री बंदच हवी,” असा एकमुखी आणि ठाम सूर बिहिटेखुर्दवासियांनी लावला आहे.

बिहिटेखुर्द येथे मुक्तिपथ व स्थानिक गाव संघटनेने सातत्याने घेतलेल्या परिश्रमामुळे गेली ५ ते ६ वर्षे गाव पूर्णपणे दारूमुक्त होते. मात्र, मागील वर्षभरापासून एका मुजोर विक्रेत्याने छुप्या मार्गाने पुन्हा दारूविक्री सुरू केली होती. यामुळे गावात पुन्हा व्यसनाधीनता वाढून कौटुंबिक व सामाजिक समस्या निर्माण झाल्या होत्या. या त्रासाला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी अखेर स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. गावातील संयुक्त पथकाने धाड टाकून १५ पेटी देशी व गोवा कंपनीची दारू जप्त केली आणि आरोपी विक्रेत्याला पोलिसांच्या हवाली केले. कोरची पोलिसांनी याप्रकरणी संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

गावात पुन्हा कोणीही दारूविक्री करण्याचे धाडस करू नये, यासाठी ‘मुक्तिपथ’च्या तालुका प्रेरक अरुणा गोनाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते खालील ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आले.

५० हजारांचा दंड: गावात पुन्हा दारूविक्री करताना आढळल्यास संबंधित विक्रेत्याला रु. ५०,०००/- चा दंड ठोठावून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

दारू पिऊन भांडण केल्यास ५ हजारांचा दंड: दारू पिऊन गावात तमाशा किंवा भांडण-तंटे केल्यास रु. ५,०००/- दंड आकारला जाईल.

माहिती देणाऱ्यास बक्षीस: गुपचूप दारूविक्री करणाऱ्याची गुप्त माहिती देणाऱ्या नागरिकाला रु. ५,०००/- चे रोख पारितोषिक दिले जाईल.

गावाला पूर्ववत पूर्णतः दारूमुक्त करण्यासाठी आता ‘शक्तिपथ’ संघटना पुढाकार घेणार आहे. याशिवाय गावातील दारूचे व्यसन जडलेल्या नागरिकांना यातून बाहेर काढण्यासाठी विशेष व्यसन उपचार व समुपदेशन शिबिर आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही या वेळी घेण्यात आला. या बैठकीला व कारवाई दरम्यान ग्रामपंचायत सदस्य प्रवीण सहारे, शतरोहन घुघवे, चदरसाया कोल्लो, जालमसिंग घुघवे, निळकंठ सहारे, कमलाबाई सहारे, राकेश जाता, करिष्मा खुजेरी, विमलबाई कारिहरताल, चेतन सोनकुकरा, नारायण मिरी, दुपती साहाडा यांच्यासह गावातील महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button