
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील ढेकणी गावाला दारूमुक्त करण्यात ग्रामस्थ, गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूला यश आले आहे. आता जवळपास तीन वर्षभराचा कालावधी पूर्ण होऊनही दारूबंदी कायम आहे. 2023 मध्ये गावात उभारण्यात आलेले विजयस्तंभ दारूमुक्त गावाची ओळख दर्शवित आहे.
ढेकणी हे गाव गेल्या तीन वर्षांपासून दारूविक्री मुक्त गाव आहे. या गावातुन अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी दारूविक्रेत्यांना वारंवार नोटीस देणे, दारूविक्रीचा व्यवसाय बंद करण्यासंदर्भातील हमीपत्र लिहून घेण्यात आले. तसेच कायम दारूमुक्त गाव राहावे, शांतता टिकून राहावी, यासाठी ग्रामस्थांनी एकमताने दारूबंदीचा ठराव घेऊन जो कोणी दारू विक्री करणार त्याला ५ हजार रुपये व एक बोकड अशा स्वरूपातील दंड आकारण्याचा निर्णय घेतला. अशा विविध उपायोजना करून गावातून अवैध दारू हद्दपार करण्यात आली.
गावातून अवैध दारूविक्री हद्दपार करून या गावाने विजयस्तंभ उभारला आहे. गावात पुन्हा अवैध दारूविक्री होऊ नये, याकरिता मुक्तीपथच्या मार्गदर्शनाखाली संघटना सक्रीय आहे. तालुका उपसंघटक आनंद सिडाम यांनी वेळोवेळी गावात विविध उपक्रम राबवित, लोकांना दारूविक्री बंदीसाठी प्रोत्साहित केले.
यासाठी गाव पाटील दिवाकर नरोटे, सुखदेव कुमोटी, रवींद्र गावडे, अर्जुन मडावी, लक्ष्मण कोंदामी, भाष्कर कुमोटी, अजय कुमोटी, वनिता मठ्ठामी, निवृता कुमोटी, सुनीता कुमोटी, देवलाबाई गावडे, मानिबाई ताडामी, रुपाली मट्ठामी, सोनाली कोवासे यांच्यासह गावकरी यांनी पुढाकार घेतला आहे.



