
कर्जमाफी, ४८ हजार कोटींची वीजबिल माफी अन् आधुनिक तंत्रज्ञानावर भर; गडचिरोलीत पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांची माहिती
गडचिरोली : महाराष्ट्रातील शेतकरी, शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घेतले आहेत. या ऐतिहासिक निर्णयांचे स्वागत करत माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त केले आहेत.
गडचिरोली येथील निवासी जनसंपर्क कार्यालयात आयोजित विशेष पत्रकार परिषदेत डॉ. अशोक नेते यांनी सरकारची कर्जमाफी, वीजबिल माफी आणि कृषी क्षेत्रातील विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.
‘अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’: राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा थेट लाभ मिळणार आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ३८ हजार कोटींची कर्जमाफी दिल्यानंतर, आता अधिक व्यापक स्वरूपात शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येत आहे. ४८ हजार कोटींची जुनी वीजबिल थकबाकी माफ: शेतकऱ्यांवरील आर्थिक संकटाचा भार कमी करण्यासाठी सुमारे ४८ हजार कोटी रुपयांची जुनी वीजबिल थकबाकी माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना दिवसा १२ तास सक्षम वीजपुरवठा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जलयुक्त शिवार व आधुनिक शेती: ‘मागेल त्याला शेततळे’ आणि ‘जलयुक्त शिवार’ योजनांमुळे शेतकरी वर्षातून दोन ते तीन पिके घेऊ लागले आहेत. याशिवाय शेतीमध्ये ड्रोन, डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर वाढवून शेतीचा खर्च कमी करण्यावर भर दिला जात आहे. बाजारपेठ व नुकसान भरपाईचे संरक्षण: महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, पीकविमा, कृषी यांत्रिकीकरण यासह कापूस, कांदा आणि सोयाबीन या पिकांची शासकीय खरेदी करून शेतकऱ्यांना बाजारपेठेतील चढ-उतारांपासून संरक्षण दिले जात आहे.
“शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. शेतकऱ्याला कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून शेतीला उद्योगाचा दर्जा देत आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने महायुती सरकारची वाटचाल सुरू असल्याचे डॉ. अशोक नेते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, कि.मो. प्रदेश सचिव रमेश भुरसे, भाजप नेते प्रमोद पिपरे, रेखा डोळस, प्रकाश गेडाम, डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, सीमा कन्नमवार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर यांच्यासह पक्षाचे सर्व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



