गडचिरोलीविदर्भ

दिभना येथे ‘बाल हक्क सप्ताह’ उत्साहात; ‘दारूमुक्त माझे गाव’ पथनाट्याने वेधले लक्ष

बाल कल्याण समिती अध्यक्ष वर्षा मनवर यांचे मार्गदर्शन ; ‘१०९८‘ चाईल्ड लाइनचा वापर करण्याचे आवाहन

गडचिरोली : बाल हक्क सप्ताहाचे औचित्य साधून २७ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील दिभना येथे ग्राम बाल संरक्षण समितीच्या सहकार्याने जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्था (कुरखेडा) आणि ‘लहर संस्था’ (दिल्ली) यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या “सुरक्षित समुदाय जिथे बालपण आनंदी” या प्रकल्पांतर्गत हा कार्यक्रम पार पडला.

दिभना गावातील फुले दांपत्य स्मारक या चौकात झालेल्या या कार्यक्रमाला बाल कल्याण समिती, गडचिरोलीच्या अध्यक्षा वर्षा मनवर यांनी अध्यक्षस्थान भूषवले व प्रमुख मार्गदर्शन केले. वर्षा मनवर यांनी बाल कल्याण समितीबद्दल माहिती देताना सांगितले की, ही समिती मुख्यतः काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना न्याय देण्यासाठी काम करते. अनाथ, सोडून दिलेले, हरवलेले किंवा इतर संकटात असलेल्या मुलांच्या कल्याणाचे व्यवस्थापन करणे हे तिचे मुख्य कार्य आहे.

त्यांनी उपस्थित नागरिकांना चाइल्डलाइन १०९८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले. गावात मुलांवर अत्याचार होत असल्यास, बालविवाह होत असल्यास किंवा इतर कोणत्याही मदतीसाठी या क्रमांकावर कॉल करून मुलांचे संरक्षण करावे, असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या शेवटी गावातील बालगटाने सादर केलेल्या पथनाट्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. बालगटाने “दारूमुक्त माझे गाव” या सामाजिक समस्येवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर केले, ज्याद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. यानंतर ‘डिजिटल सेफ्टी’ (मोबाईल एडिशन) वर आधारित शपथविधी कार्यक्रम घेण्यात आला, ज्यामुळे मुलांमध्ये तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर करण्याबाबत जागरूकता वाढली.

यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका भारती शिवणकर, अंगणवाडी सेविका सुनंदा जेंगठे, निरुपा कोहापरे, आशा जया नैताम, शिक्षक श्यामराव रामटेके, सुषमा नन्नावरे, निखिल बोरकर, ग्रामपंचायत सदस्य राजू जेंगठे, सदू जेंगठे, ग्राम बाल समितीचे सदस्य, शाळेतील मुलं आणि गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाची पार्श्वभूमी नितीन खोब्रागडे (जिल्हा समन्वयक) यांनी सांगितली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जि. प. शाळेचे शिक्षक श्यामराव रामटेके यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button