
स्वतंत्र मजदूर युनियन व अंगणवाडी स्वयंपाकी महिलांचा निर्धार
गडचिरोली : डाॅ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत अंगणवाडी स्वयंपाकी महिलांना फक्त 1 हजार रुपये मासिक मानधनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे आजच्या महागाईच्या युगामध्ये अंगणवाडी महिलांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे सरकार व प्रशासनाचे निरंतर लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र सरकार व प्रशासनद्वारा कोणत्याही प्रकारचे लक्ष न देता अंगणवाडी महिलांचे मासिक मानधन वाढविण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र मजदूर युनियन व डाॅ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत कार्य करणाऱ्या स्वयंपाकी महिला यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी मुंबई येथील विधीमंडळ येथे होणाऱ्या आर्थिक अधिवेशनात धडक मोर्चा काढण्याचा निर्धार नुकताच आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
बैठकीमध्ये अमृत आहार योजनेंतर्गत स्वयंपाकी महिला संगठनेच्या कामाचा अहवाल वाचन करण्यात आला. मागील एक वर्षाचा कालावधि पूण होऊन सुध्दा सरकार व प्रशासनाकडून स्वयंपाकी महिलांच्या मानधनवाढी संबंधित कोणत्याही प्रकारची उपाययोजना व ठोस निर्णय घेतले जात नाही आहेत. तसेच जीआर पण काढल्या गेलेला नाही. मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मानधनवाढी संदर्भात निवेदनातून निरंतर मागणी केली जात आहे. परंतु शासन व प्रशासनाकडून यासंदर्भात कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्यामुळे स्वतंत्र मजूदर युनियन व अमृत आहार अंगणवाडी स्वयंपाकी महिला यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी अधिवेशनात विधीमंडळ मुंबई येथे मोर्चा काढण्याचा निर्णय आयोजित बैठकीदरम्यान घेण्यात आला.
यावेळी अमृत आहार अंगणवाडी स्वयंपाकी महिला संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा चौधरी, दिपाली बावनथडे, उषा धुर्वे, अंजु गेडाम, सुशिला केरामी, लक्ष्मी कुमोटी, सुनिता गावडे, संध्या लोनबले, सरिता गावडे, लता डोंगरवार, सुनंदा मडावी, संजीवनी सयाम, वैशाली मडावी, वैशाली नरोटे, प्रिया कांबळे, स्वतंत्र मजदूर युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व जिल्ह्यातील अंगणवाडी स्वयंपाकी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



