
एक जखमी ; देव्हाडी एमआयडीसीतील घटना, चालक फरार
तुमसर : तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी एमआयडीसीजवळ शनिवारी सकाळी साडेआठ वाजता एक भीषण अपघात घडला. कोळशाने भरलेल्या एका भरधाव टिप्परने प्रथम उभ्या असलेल्या ट्रकला आणि नंतर समोरून येणाऱ्या एसटी बसला धडक दिली. सुदैवाने एसटीमधील सर्व प्रवासी, चालक व वाहक यांचा जीव वाचला असून, मोठा अनर्थ टळला आहे.
सकाळच्या वेळी, राजवीर ट्रान्सपोर्ट कंपनीचा एक कोळशाचा टिप्पर (क्र. एमपी ०७ एचबी ६१७४) भरधाव वेगाने येत होता. वजनकाट्याजवळ अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला (क्र. सीजी ०८ बीसी २१००) मागून जोरदार धडक दिली. यानंतर टिप्परचा वेग आणखी वाढला आणि ते विरुद्ध दिशेने येणाऱ्या साकोली-तुमसर एसटी बसवर (क्र. एमएच ०७ सी ९५२१) आदळले. अपघात एवढा भीषण होता की टिप्परच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला. या अपघातात बसमधील एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाल्याचे कळते. अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून पळून गेला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघातातील ट्रक, बस आणि टिप्पर महामार्गाच्या कडेला असल्याने मोठा अनर्थ टळला.
साकोली डेपोची बस चालवणारे चालक अत्यंत सतर्क होते. त्यांना टिप्पर अनियंत्रित झाल्याचे दिसताच त्यांनी बस सुरक्षित बाजूला घेतली. राष्ट्रीय महामार्गावरील या भागात वारंवार अपघात होत असल्याने पोलीस प्रशासनाने अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



