
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधला संवाद; अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे निर्देश
चिमूर : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी चिमूर तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
खासदार डॉ. किरसान यांनी तालुक्यातील खडसंगी, रेंगाबोडी, चिचघाट, जामणी, आमडी, खुरसापार यासह अनेक गावांना भेट दिली. शेतकऱ्यांनी त्यांना सोयाबीन आणि कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली. यावर डॉ. किरसान यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला वेळेत मिळावा यासाठी ठोस पावले उचलण्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात चिमूरचे तहसीलदार श्रीधर राजमाने, गटविकास अधिकारी फुलजारे यांच्यासह कृषी विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी, चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय गावंडे, जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके, विजय झाडे, प्रतिक ढोक, बंडू मेश्राम, सुनील गुळघे, विनोद देठे, चंदाताई कारेकार, इरफान पठाण, दत्ताजी देहारे, नंदूजी नागोसे, साहिल कुरेशी, रुपचंद सहस्त्रर, बबन कुबडे, रामाजी शेंडे, तेजराम झाडे, भारत नन्नावरे, विठ्ठल रणदिवे, प्रफुल दरे, उदयभान राऊत यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



