गडचिरोलीविदर्भ

नगरसेवकाच्या कृत्यांविरुद्ध ‘देवा भाऊ’च्या बहिणींचे आमरण उपोषण!

PM रोजगार योजनेत लाखो रुपयांचा ‘मशीन घोटाळा’ ; गरीब महिलांच्या नावे कर्ज काढून नगरसेवक पिपरे दाम्पत्याने स्वतःची घरे भरल्याचा आरोप

गडचिरोली : एकीकडे सरकार महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे लोकप्रतिनिधीच गरीब शेतमजूर महिलांची फसवणूक करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गुंड प्रवृत्तीचे नगरसेवक आशिष अरुण पिपरे आणि नगरसेविका सौ. सोनाली आशिष पिपरे यांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या नावाखाली ४५ गरीब महिलांची कोट्यवधींनी फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. प्रशासकीय स्तरावर वारंवार तक्रार करूनही केवळ थातुर मातुर चौकशी होत असल्याने अखेर संतप्त महिलांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

सन २०२० मध्ये आशिष पिपरे यांनी गरीब महिलांना प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेची स्वप्ने दाखवली. बँकांशी संगणमत करून या महिलांच्या नावे लाखो रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. मशीन खरेदीत मोठी तफावत: अहमदाबाद (गुजरात) येथून अवघ्या २५,५०० रुपयांत मिळणारी अगरबत्ती मशीन महिलांच्या नावावर १,००,००० रुपयांना दाखवण्यात आली. स्वतःचा फायदा: महिलांना पूर्ण मशीन न देता, उरलेल्या पैशातून आशिष पिपरे यांनी स्वतःसाठी जमीन खरेदी केली, आलिशान घर बांधले आणि नवीन गाडी घेतल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. प्रकल्प बंद, महिला संकटात: काही दिवसांतच अगरबत्ती प्रकल्प बंद पाडून पिपरे यांनी हात झटकले. आता बँकांनी महिलांना कर्ज वसुलीच्या नोटिसा धाडल्या असून न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.

महिलांनी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पत्रकार परिषद घेऊन १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, आशिष पिपरे यांच्या राजकीय वजनामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. “आम्ही फसवले गेलो असताना, उलट आम्हालाच जबाबदार धरले जात आहे,” अशा शब्दांत महिलांनी आपला संताप व्यक्त केला.

केवळ अगरबत्ती प्रकल्पच नव्हे, तर पिपरे यांनी इतरही अनेक फसवणुकीचे प्रकार केल्याचे समोर आले आहे: ट्रॅक्टर घोटाळा: एका महिलेला वडिलांच्या नावावर असलेला ट्रॅक्टर नोटरी करून देऊन लाखो रुपयांना लुटले. जमीन मोबदला फसवणूक: चामोर्शी येथील एका गरीब शेतकऱ्याला बॅरेजच्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये लुबाडल्याचा आरोप आहे.

आशिष पिपरे हे मोठ्या नेत्यांच्या नावाचा वापर करून अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची ‘एसआयटी’ (SIT) चौकशी होऊन पिपरेला तात्काळ अटक व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा, अन्यथा आम्ही उपोषण मागे घेणार नाही. असा इशारा पीडित महिलांनी दिला आहे.

कविता किरमे, वंदना कोठारे, सुषमा धोडरे, अनिता पिपरे, देवांगना गौतम, छाया बोदलकर, मीनाक्षी पिपरे, जयश्री पिपरे, अश्विनी गव्हारे, मनीषा गव्हारे, चंद्रशेखर मस्के, ओमदास झरकर, वेणू धोडरे, रेखा गव्हारे, शालिनी पिपरे, शिला धोडरे, साधना धोडरे, मिलिंद भांडेकर, शारदा पिपरे, सुषमा बुरांडे, अर्चना बुरांडे यांच्यासह पीडित महिला उपोषणात सहभागी झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button