
न्यायाधीश व विधीज्ञांच्या उपस्थितीत पर्यावरण संरक्षणाचा संदेश
गडचिरोली : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या समान किमान कार्यक्रमानुसार, गडचिरोली येथे ११ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विधी सेवा सदन’ येथील प्रांगणात वृक्षारोपण करून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमाला गडचिरोली येथील न्यायव्यवस्थेतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यात व्ही. आर. जोशी (अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश), व्ही. एस. खोत (तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश), एस. पी. सदाफळे (दिवाणी न्यायाधीश (व. स्तर)), एस. बी. विजयकर (मुख्य न्यायदंडाधिकारी), ए. पी. खानोरकर (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण), श्रीमती व्ही. आर. मालोदे (सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी), श्रीमती एन. ए. पठाण (२रे सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी) यांचा समावेश होता.
याशिवाय, विधी क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींचीही उपस्थिती होती. यात ॲड. एस. एस. भट (मुख्य न्यायरक्षक, न्यायरक्षक कार्यालय, गडचिरोली), ॲड. के. एस. आखाडे (अध्यक्ष, जिल्हा वकिल संघ, गडचिरोली) आणि ॲड. पी. पी. ब्राम्हणवाडे (सचिव, जिल्हा वकिल संघ, गडचिरोली) यांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली आणि जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली येथील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे पर्यावरणाच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा संदेश समाजात पोहोचवण्यास मदत झाली.



