
ट्रक चालक अटकेत ; पाच जणांच्या मृत्यूने संपूर्ण जिल्हा हळहळला, जखमींवर उपचार सुरू
भंडारा : भंडारा जिल्ह्यात लग्नाचे वऱ्हाड घेऊन परतणाऱ्या व्हॅनला झालेल्या भीषण अपघातात मृत्यू पावलेल्या पाच जणांपैकी अड्याळ येथील तिघांवर शुक्रवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच घरातील मायलेकी आणि अन्य एका मुलीचा मृतदेह पाहून अख्ख्या गावाला अश्रू अनावर झाले होते. अड्याळ येथील स्मशानभूमीत एकाच वेळी तिघांनाही अग्नी देण्यात आला, हे दृश्य पाहून उपस्थितांचे काळीज पिळवटून निघाले.
गुरुवारी रात्री झालेल्या त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात दुर्गा उर्फ शिला देवराम नगरे (४५), त्यांची मुलगी नैना देवराम नगरे (२१) आणि नातेवाईक श्वेता पुरुषोत्तम नगरे (१७) यांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास या तिघींचीही अंत्ययात्रा निघाली. आप्तस्वकीयांचे कलेवर पाहून नगरे कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. स्मशानभूमीत मोकळ्या जागेत तिन्ही सरणे एकाच वेळी रचण्यात आली होती. तर, अपघातात प्राण गमावलेले वेलतूर येथील दाम्पत्य प्रभाकर चाचेरकर (५५) आणि मुन्नी चाचेरकर (४५) यांच्यावरही त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.
या भीषण अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक (क्र. सीजी ०८ एडब्ल्यू ६६३५) अड्याळ पोलिसांनी जप्त केला आहे. ट्रक चालक दुर्गेश लखनलाल यादव (४०), रा. बेलतारा, जि. बिलासपूर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक जयराम चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षकांसह अड्याळ पोलिसांचा मोठा ताफा गावात तैनात करण्यात आला होता. रात्री १ वाजेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत पाचही मृतदेहांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय, अड्याळ येथे पार पडले. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली होती.
अपघातातून बचावलेले मात्र गंभीर जखमी असलेले रक्षा चंद्रभान खेडकर (१८), नेहा गिरधर नान्हे (१६), सोहम जोगेश्वर गेडेकर (२५) आणि उमेश बोडनलाल सोनवाने यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नान्हे आणि नगरे परिवारासह संपूर्ण अड्याळ परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



